मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
ठाणे : भिवंडी आणि कल्याणपाठोपाठ शीळफाटा ते बदलापूपर्यंत मेट्रोसेवेचा विस्तार करण्याची तसेच नियोजित टिटवाळा-मुरबाड रेल्वे मार्गाच्या कामासाठी राज्य शासनाकडून ५० टक्के निधी देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भिवंडीतील एका कार्यक्रमात बोलताना केली.
ठाणे-वसई जलवाहतूक प्रकल्प आणि मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन १५ दिवसात करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यक्रमात बोलताना जाहीर केले.
मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे ते वडपे रस्त्याचे आठ पदरीकरण तसेच शहापूर ते खोपोली रस्त्याचे चार पदरीकरण या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी भिवंडीत झाले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिळफाटा ते बदलापूर मेट्रो सेवेचा विस्तार करण्याची घोषणा केली. तसेच या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यात येईल आणि त्यामधील अडचणी दूर करून प्रकल्प आराखडा तयार करण्यात येईल. त्यानंतर या प्रकल्पास मान्यता देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मेट्रो आणि रस्ते प्रकल्पामुळे भिवंडीचा विकास होईल. लॉजिस्टिक पार्कमुळे रोजगार उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच माणकोली आणि रांजणोली पुलाचे रखडलेले काम १५ ऑगस्टपर्यंत, तर दुर्गाडी पुलाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई, ठाण्यासह कोकणात जलमार्गाने वेगाने वाहतूक होऊ शकेल. त्यामुळे एमएमआर क्षेत्रात जलवाहतुकीसाठी पुढील आठवडय़ात आराखडय़ाला मंजुरी दिली जाईल. तसेच उच्च न्यायालयाच्या संमतीने दोन महिन्यांत रो-रो प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
औरंगाबादेत एअर बसची चाचणी घेण्यात आली असून ठाणे-भिवंडी मार्गावर ही डबल डेकर एअर बस चालविण्याबाबत नियोजन करावे लागेल. तसेच माळशेज घाटाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनच्या तोडीस तोड असा एक लाख कोटी रुपये खर्चाचा आणि १२ तासांत मुंबई ते दिल्ली अंतर कापणाऱ्या द्रुतगती महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्य़ातील आठ जेट्टींच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचेही त्यांनी जाहीर केले. जिल्ह्य़ाच्या आदिवासी भागात जट्रोफाचे उत्पादन वाढविले तर आदिवासी आणि शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल तसेच पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा जास्त वापर करता येईल, असे त्यांनी सांगितले.
जलवाहतुकीसाठी स्वतंत्र महामंडळ?
इटलीतील व्हेनिस विमानतळाच्या धर्तीवर विमानतळावर जलवाहतुकीने जाण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगतिले. गंगा शुद्ध होऊ शकते, तर मुंबईचा समुद्र का नाही, असे सांगत एमएमआर क्षेत्रात समुद्रामार्गे जलवाहतूक प्रकल्प राबविण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, अशा सूचना त्यांनी राज्य शासनाला केल्या. तसेच जेएनपीटीला दरवर्षी १६०० कोटींचा फायदा होत असून महामंडळात जेएनपीटीचाही सहभाग घेता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.