ठाण्याचा विस्तार कमालीचा वाढला असून ५० ते ६० चौरस किलोमीटरच्या जुन्या ठाण्याचा पसारा १४७ चौरस किमीपर्यंत वाढला आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांची लोकसंख्या २२ लाखांपर्यंत पोहचली आहे. ठाणे महापालिका हद्दीत मोडणाऱ्या या सर्व भागासाठी सद्य:स्थितीत चार रेल्वे स्थानके असली, तरी एकटय़ा ठाणे स्थानकावर दररोज सुमारे सहा लाख प्रवाशांचा भार पडतो. ठाणे आणि आसपासच्या शहरांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय उभा राहावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकारणाने ठाणे मेट्रोचा प्रकल्प हाती घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणेकरांना मुंबई-ठाणे हा मेट्रो प्रवास अनुभवता येणार आहे. घोडबंदर आणि या भागात वाढलेल्या नव्या ठाण्याच्या प्रवाशांना याचा लाभ घेता येणार असून त्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत येण्यासाठीचा हेलपाटा, वेळ आणि त्यामुळे पर्यायाने होणारी वाहतूक कोंडीही दूर होऊ शकणार आहे.
काय आहे प्रकल्प?
ठाणे शहर तसेच घोडबंदर पट्टय़ाचा झपाटय़ाने होणारा विकास लक्षात घेऊन मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने शहरात कोणत्या मार्गावरून मेट्रो रेल्वे सुरू करता येईल, याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले होते. ठाणे शहरातील सुमारे १२ लाखांहून अधिक लोकसंख्येसाठी एकमेव रेल्वे स्थानक अस्तित्वात असल्याने या शहरामधून मेट्रो सुरू करण्याची निकड व्यक्त करण्यात आली आणि या माध्यमातून सर्वेक्षणाची प्रक्रियाही उरकण्यात आली. या सर्वेक्षणासाठी महानगर विकास प्राधिकरणाने मेसर्स कन्सलटिंग इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने रेल्वे स्थानक, तीन हात नाका, कापूरबावडी-कासारवडवली (घोडबंदर) या मार्गावरील नियोजित मेट्रो मार्गाचा सविस्तर अहवाल नुकताच महानगर विकास प्राधिकरणास सादर केला असून यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा खर्च येईल, असा अंदाज ठरविण्यात आला आहे. सुमारे १०.८७ किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पात रेल्वे स्थानकापासून घोडबंदर मार्गापर्यंत ११ स्थानके निश्चित करण्यात आली आहेत.
मंजूर प्रकल्प कसा आहे?
वडाळा-कासारवडवली ठाणे मेट्रो रेल्वे हा मार्ग पूर्ण उन्नत नसून त्या ऐवजी वडाळा ते कापूरबावडीपर्यंत मेट्रो भूमिगत असेल, तर कापूरबावडीपासून कासारवडवलीपर्यंत उन्नत स्थानक या मेट्रोमध्ये असेल. हा प्रकल्प आता दहा हजारांहून १९ हजार ९७ कोटीपर्यंत पोहचला आहे. भुयारी मार्गासाठी खर्च जास्त असल्याने कापूरबावडी ते कासारवडवली या पट्टय़ात मार्ग थोडा उन्नत असल्याने प्रकल्पाचा खर्च थोडा कमी होणार आहे. मेट्रोची या मार्गाची जोड मेट्रो १, मोनो रेल्वेशी असल्याने प्रवाशांना स्थानकाची आदलाबदल करता येऊ शकणार आहे. मुंबई आणि ठाण्यात मिळून एकूण ३०.८ किमीच्या मेट्रो मार्गावर ३२ स्थानके आहेत. त्यातील २० स्थानके मुंबई हद्दीत, तर उर्वरित १२ ठाण्याच्या हद्दीत असतील, २६ भूमिगत, सहा स्टेशन्स उन्नत (एलिव्हेटेड) असतील. वडाळा, आणिक, प्रियदर्शनी भागात पूर्व द्रुतगती मार्गाखालून कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर आणि पुढे एलबीएस रोड मार्गे ठाण्यामध्ये प्रवेश करणार आहे.
सद्य:स्थिती
ठाणे मेट्रो प्रकल्पाचा आराखडा एमएमआरडीएने राज्य शासनाकडे सादर केला होता. राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला असून, मेट्रोच्या कामाला सुरूवात करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने आवश्यक मंजुरी देऊ केल्या आहेत.
स्थानके
भक्ती पार्क मेट्रो, अणिक नगर, प्रियदर्शनी, कुर्ला नेहरूनगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, विद्याविहार मेट्रो, घाटकोपर मेट्रो, आर-सीटी मेट्रो, गोदरेज कॉलनी, विक्रोळी मेट्रो, गांधीनगर, कांजुरमार्ग मेट्रो,   भांडुप मेट्रो,  सोनापूर,  मुलुंड नाका, ठाणे तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापुरबावडी, मानपाडा, टिकूजीनी वाडी, पाटलीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली.