लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानक भागातील आणि ९० फुटी रस्त्यावरील सर्वाधिक वर्दळीच्या म्हसोबा चौकात रस्ता अडवून टपऱ्या उभारण्याची मोठी स्पर्धा स्थानिक व्यावसायिकांमध्ये लागली आहे. या बेकायदा टपऱ्यांवर राजकीय नेत्यांचे फलक लावून त्याच्यावर पालिकेने कारवाई करू नये, अशीही व्यवस्था व्यावसायिक करत आहेत. या सर्व बेकायदा टपऱ्या हटविण्याचे आदेश आयुक्तांनी देण्याची मागणी या भागात नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

खंबाळपाडा, ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता भागात भव्य गृहसंकुले उभी राहिली आहेत. मोकळा परिसर, प्रशस्त रस्ते म्हणून नागरिक या भागातील गृहसंकुलात घरे घेण्यास प्राधान्य देत आहेत. मागील काही महिन्यांपासून ९० फुटी रस्त्यावरील म्हसोबा चौकातील रस्ता, कोपरे अडवून स्थानिक आणि काही परप्रांतीय मंडळींनी या भागात टपऱ्या, पत्र्यांचे निवारे उभारण्यास सुरूवात केली आहे. हे निवारे नंतर वीटांचे बांधकाम करुन पक्के करुन जागा अडवून ठेवली जाते, अशा तक्रारी स्थानिकांनी केल्या.

आणखी वाचा-कुवत, मर्यादा ओळखून बोला! एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले

गेल्या वर्षी म्हसोबा चौकातील आडोशाचा गैरफायदा घेऊन ठाकुर्ली रेल्वे स्थानकातून ९० फुटी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्याच्या घटना चोरट्यांनी याच भागात केल्या आहेत. काही भंगार माफियांनी याठिकाणी निवारे बांधून भंगाराची गोदामे उभारण्यास सुरूवात केली आहे. डोंबिवली, ठाकुर्ली भागातील नागरिक सकाळ, संध्याकाळ ९० फुटी रस्त्यावर फिरण्यासाठी येतात. तरुण, तरुणींची संख्या सर्वाधिक असते. या भागातील नागरी वस्ती वाढली आहे. या भागातील लहान, मोठ्या व्यवसायातील उलाढाल वाढली आहे. त्याचा फायदा घेत म्हसोबा चौक भागात टपऱ्या, गाळयांची संख्या वाढत आहे, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या.

म्हसोबा चौकात, ९० फुटी रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने नोकरदारवर्गाने उभी केलेली असतात. प्रशस्त रस्ता अरुंद झाला आहे. आता टपऱ्या, गाळे वाढू लागल्याने म्हसोबा चौकाचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी रस्ते, चौक अडविणाऱ्या टपऱ्या, गाळेधारकांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. फ प्रभागाच्या अखत्यारित हा भाग येतो. आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना म्हसोबा चौकातील गाळे, टपऱ्या जमीनदोस्त करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

आणखी वाचा-बदलापूरच्या काळ्या राघूला येणार चांगले दिवस

ठाकुर्ली रेल्वे फाटकाकडून येणारा एक उड्डाण पूल म्हसोबा चौकात उतरविण्यात येणार आहे. त्या पुलाला या टपऱ्या, गाळ्यांचा अडथळा येणार आहे. एखादा टपरी, गाळेधारक न्यायालयात गेला तर पुन्हा उड्डाण पुलाच्या उताराचे काम रखडण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhasoba chowk near thakurli east railway station covered by small stalls and shops mrj
Show comments