शहापूरमधील कासार आळीत MI कंपनीच्या नोट ५ या मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने घराला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत पती-पत्नीसह दोन लहान मुले जखमी झाले आहेत. राजू शिंदे आणि रोशनी शिंदे असे या दाम्पत्याचे नाव असून ते दोघेही यात ३५ टक्के भाजले आहेत. तर त्यांची लहान मुले किरकोळ जखमी झाले आहेत.
कासार आळीतील प्रतीक्षा अपार्टमेंट येथे तळमजल्यावर शिंदे कुटुंबीय राहतात. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास राजेश शिंदे मोबाइल चार्जिंगला ठेवून परत झोपले. थोड्यावेळाने अचानक बॅटरीचा स्फोट झाला. स्फोटचा मोठा आवाज झाल्याने सोसायटीतील अन्य रहिवासी आणि शेजारची लोक मदतीसाठी शिंदे कुटुंबीयांच्या घराच्या दिशेने पळाले. त्यांनी पाणी व माती फेकून आग विझवली व शिंदे कुटुंबियांना शहापूर उपजिल्हारुग्णालयात नेले.
या दुर्घटनेत राजेश व रोशनी शिंदे या दाम्पत्यासह त्यांची ऋतुजा व अभिषेक ही दोन मुले भाजली आहेत. शिंदे दाम्पत्य गंभीररीत्या भाजले असून त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोबाइल बॅटरीचा स्फोट झाला त्यावेळी घरातील गॅस सिलिंडरमधूनही गळती सुरु होती. त्यामुळेच हा स्फोट झाल्याचा दावा स्थानिकांनी केला. तर अग्निशमन दलाने अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही, या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे सांगितले.