पूर्वा भालेकर

ठाणे – यंदा परतीच्या पावसामुळे दिवाळीच्या तयारीवर परिणाम झाला असला तरी, पर्यावरणपूरक कंदिलांची लोकप्रियता कायम आहे. कागदी कंदिलांचा पर्याय म्हणून सध्या बाजारात मायक्रोन धाग्यापासून तसेच साडीच्या कपड्याने बनवलेले कंदील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कंदिलांना पावसाचा धोका कमी असतो आणि ते टिकाऊ असल्यामुळे ग्राहकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरक कंदिलांप्रमाणेच हे कंदीलही रंगीबेरंगी आणि आकर्षक दिसतात, त्यामुळे सजावटीसाठी उत्तम पर्याय ठरत असल्याची माहिती ठाण्यातील कंदिल विक्रेत्यांनी दिली.

दिवाळीला अवघा आठवडा शिल्लक राहिला आहे. असे असले तरी परतीचा पाऊस अद्यापही थांबलेला नाही. त्यामुळे यंदा दिवाळीची खरेदी तसेच सजावट कशी करायची असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात निर्माण झाला आहे. दिवाळीनिमित्त ठाणे, मुंबईसह उपनगरातील बाजारपेठा सजल्याचे दिसून येत आहे. परंतू, सध्या अधून-मधून बरसत असलेल्या पावसामुळे वस्तू विक्रेत्यांच्या मनातही वस्तू खराब होण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यात, गेले काही वर्षांपासून नागरिकांचा कल हा कागदापासून तयार करण्यात आलेल्या पर्यावरणपुरक कंदील खरेदीकडे आहे. परंतू, यंदाच्या वर्षी पावसामुळे हा कंदिल भिजला तर, तो खराब होईल या भितीपोटी नक्की कोणता कंदील यंदाच्या वर्षी खरेदी करायचा असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

हेही वाचा >>>“मताधिक्य द्या, कथोरे मंत्रिमंडळात दिसतील”, विनोद तावडेंचे सूचक विधान, किसन कथोरेंनी भरला अर्ज

कागदी कंदिलांना पर्याय म्हणून बाजारात मायक्रोन धागा आणि साडीच्या कपड्यापासून तयार करण्यात आलेले कंदील विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मायक्रोन धाग्याचा कंदील हा पूर्णपणे विणलेला आहे. त्यामुळे या कंदिलाची विक्री ८०० रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत होत आहे. तर, साडीच्या कपडा आणि दिवाळी शुभेच्छा चे छपाई केलेल्या चित्राचा वापर करुन पारंपारिक असे विविध रंगाचे कंदिलाची विक्री ४०० रुपयांपासून ते ८०० रुपयांपर्यंत केली जात आहे. हे कंदिल आकर्षित दिसत असल्यामुळे ग्राहकांकडून या कंदिलांना सर्वाधिक पसंती असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. त्यासह, दरवर्षी प्रमाणे यंदाही बाजारात झुट, पैठणी, खण, बांबू पासून तयार करण्यात आलेले कंदील देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे कंदील ४०० रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंत विक्री केले जात आहेत.

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात बंडोबांना थंड करण्याचे महायुतीपुढे आव्हान

आचारसहितेमुळे मोठ्या कंदिलाच्या मागणीत घट

दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत विविध सार्वजनिक मंडळ तसेच गृहसंकुलांसह राजकीय पक्षांकडूनही मोठ्या कंदीलाला सर्वाधिक मागणी असते. परंतू, यंदा विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसहितेमुळे राजकीय पक्षांकडून मोठ्या कंदीलाची यावर्षी आगाऊ नोंद झाली नसल्याची माहिती ठाण्याचील घंटाळी मंदिर परिसरातील कंदील विक्रेते स्वप्नील जाधव यांनी दिली. त्यामुळे केवळ सार्वजनिक मंडळ तसेच गृहसंकुलांकडूनच मोठ्या कंदीलाला मागणी असल्याचे स्वप्नील यांनी सांगितले.

(सचिन देशमाने)