पाणी टंचाईच्या दिवसात घरांमध्ये बुस्टर लावून पाणी खेचण्याचे प्रकार वाढीस लागले असून महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सुदर्शननगर परिसरातील निवासी भागातील तीन वसाहतींमधील काही घरांमध्ये बेकायदेशीरपणे लावण्यात आलेले बुस्टर पंप जप्त केले. या भागातील काही वसाहतींमधूनही अशा प्रकारे पाणी खेचण्यासाठी पंप बसविण्यात आल्याचे आढळून आले आहे. या प्रकारांमुळे आसपासच्या परिसरातील वसाहतींमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. तसेच यासंबंधीची माहिती मिळाल्यास रहिवाशांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहन औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करू लागली आहे. २७ गावांमधील काही रहिवाशांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. परिणामी नागरिकांना गावात टँकर आला की त्याकडे धाव घ्यावी लागते. निवासी विभागात तसेच गावांत या समस्येने तीव्र स्वरूप धारण केले असताना काही बडय़ा वसाहतींमध्ये बुस्टर पंप लावून पाणी खेचून घेतले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे नागरिकांना समान पाणीवाटप होत नाही, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. यासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत निवासी विभागातील २५ ते ३० महिलांनी एकत्र येऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यालय गाठले. येथील अधिकाऱ्यांना सोसायटय़ांना बुस्टर लावण्याची परवानगी आहे का, असा सवाल केला. निवासी विभागातील अनेक सोसायटय़ा, बंगले हे बुस्टर लावत असल्याने आम्हाला पाणी येत नाही, असे या महिलांचे म्हणणे होते.
याविषयी माधुरी चव्हाण या म्हणाल्या, आमच्या वसाहतीत गेले काही दिवस पाणी येत नाही. काही बडय़ा वसाहतींमध्ये बुस्टर लावले जातात. याविषयी यापूर्वीही आम्ही तक्रार केली होती. परंतु महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी समाधानकारक उत्तर देत नाहीत, अशी तक्रार चव्हाण यांनी केली. या तक्रारीनंतर औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी काही वसाहतींमधील बुस्टर पंप काढून टाकले आहेत.

Story img Loader