अंबरनाथ : थेट रस्त्यांवर येऊन मिळणारे सांडपाणी, त्यामुळे पडणारे खड्डे आणि परिणामी काटई अंबरनाथ रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीचे ग्रहण लवकरच दूर होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने खोणी ते अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका या काटई कर्जत राज्यमार्गावरील महत्वाच्या भागाच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी निविदा जाहीर केली आहे. ११६ कोटी ४६ लाख रुपये खर्चातून या काँक्रिटीकरणासह काकोळे येथील वालधुनी नदीवरील जुन्या पुलाचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे काटई ते अंबरनाथ प्रवास वेगवान होणार आहे.
अंबरनाथ, बदलापूरसह आसपासच्या परिसरासाठी काटई कर्जत राज्यमार्ग महत्वाचा आहे. याच मार्गावरून ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पनवेल असा प्रवास करता येतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहने वाढली आहेत. त्यात या रस्त्याच्या दुतर्फा नागरी वस्त्या वाढल्या आहेत. या वस्त्यांना पुरेशी सांडपाणी व्यवस्था नसल्याने या वस्त्यांमधील सांडपाणी थेट या काटई अंबरनाथ मार्गावर येत असते. परिणामी रस्ता खराब होतो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामुळे या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची मागणी केली जात होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे यापूर्वीच खोणी ते काटई या मार्गावरील एक मार्गिका तयार झाली असून, दुसऱ्या मार्गिकेवरील काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचा पुढचा टप्पा असलेल्या खोणी ते अंबरनाथ या मार्गासाठी डॉ. शिंदे यांनी निधी देण्याची मागणी केली होती. अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने खोणी – फॉरेस्ट नाका रस्ते काँक्रिटीकरणासाठी ११६ कोटी ६४ लाखांची निविदा जाहीर केली आहे. या रस्त्याच्या कामात वालधुनी नदीवरील काकोळे येथील पुलाचाही समावेश करण्यात आला आहे. एकूण १० कोटी रुपये खर्चातून या पुलाची उभारणी केली जाणार असल्याची माहिती एमआयडीसीचे विभागीय अभियंता सुधीर नागे यांनी दिली आहे. त्यामुळे या रस्त्याला गेल्या काही वर्षांत लागलेले खड्डे, वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटण्यास मदत होणार आहे.
तो पूल एकसंघ होणार
काटई अंबरनाथ मार्गावर काकोळे येथे वालधुनी नदीवर जुना पूल आहे. या पुलाची काटईहून येणारी मार्गिका उंचीवर असून काटईला जाणारी मार्गिका खालून आहे. गेल्या काही वर्षांत येथे झालेल्या काही अपघातांमुळे या पुलाची डागडुजी करण्याची वेळ आली होती. मात्र येथे नवा पूल बांधावी, अशी मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. अखेर या मागणीला यश आले असून, या पुलाची उभारणी केली जाणार आहे.