ठाकुर्ली रेल्वे स्थानकाला पालिकेकडून पाणीपुरवठा सुरू
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा थकीत बिलापोटी महामंडळाने आठवडय़ापूर्वी बंद केला आहे. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून रेल्वे स्थानकाला पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याने महामंडळाची कोंडी झाली आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाला काही वेळ देऊन त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे याविषयी पत्रव्यवहार करण्याची भूमिका घेतली आहे.
भरमसाट पाण्याचा वापर करूनही बिल भरण्याबाबत मात्र रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करते. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाला महामंडळाकडून दिवसाला ६५० घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या तीन महिन्यांत त्यांनी पाणी बिल भरलेले नाही. तीन महिन्यांचे त्यांचे निव्वळ बिल हे अठरा ते एकोणीस लाखांच्या घरात आहे. हे निव्वळ बिल आणि दंडात्मक रक्कम मिळून तीन कोटी सतरा लाख रुपये इतके बिल थकीत आहे. ही रक्कम भरल्याशिवाय पाणीपुरवठा सुरू केला जाणार नाही, अशी भूमिका एमआयडीसीने घेतली असली तरी त्यांचे हात बांधले गेले आहेत.
रेल्वे प्रशासनाने केवळ एकदा दूरध्वनीवरून आम्ही बिल भरू पाणीपुरवठा सुरू करा, असे सांगितले. मात्र आधी बिल भरा, नंतर पाणीपुरवठा सुरू होईल असे उत्तर त्यांना त्या वेळी देण्यात आले यानंतर रेल्वेने कोणताही संपर्क साधला नसल्याचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी सांगितले.
याविषयी रेल्वेच्या प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पालिकेकडून आम्हाला पाणीपुरवठा होत असल्याचे सांगून अधिक माहिती घेऊन नंतर संपर्क साधू, असे सांगितले.
पाण्याचा वापर यथातथाच..
ठाकुर्ली स्थानकाला कल्याण-डोंबिवली महापालिकेकडूनही पाणीपुरवठा होत असल्याने एवढी टंचाई त्यांना भासत नाही. स्थानकात पाणपोया आहेत; परंतु त्यांना नळच नसल्याने तसेही प्रवाशांना पिण्यास पाणी स्थानकात उपलब्ध होतच नाही. शिवाय तिथे स्वच्छतागृहही एकच आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा