‘लोकसत्ता ठाणे’ मधील वृत्ताची ‘एमआयडीसी’कडून गंभीर दखल
बदलापूर ते शिळफाटा चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बेसुमार ढाबे, हॉटेल्स आणि गॅरेज उभारण्यात आली आहेत. या धंद्यातील सर्व व्यावसायिक बारवी धरणाकडून आलेल्या एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिन्यांना छिद्र पाडून चोरीच्या नळ जोडण्या आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी घेतात. या पाणी चोरीचा शहरांच्या पाणी पुरवठय़ावर परिणाम होत आहे. त्यामुळे या व्यावसायिकांनी घेतलेल्या सर्व चोरीच्या नळ जोडण्या तोडून टाकण्यात याव्यात, अशी मागणी एमआयडीसीने पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली आहे.
२७ गावांचा परिसर हा पालिकेच्या अखत्यारित येत असल्याने एमआयडीसीने पालिकेला या भागात असलेल्या चोरीच्या नळ जोडण्या तोडण्याची कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे. एमआयडीसीचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर जगताप यांनी पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना या मुख्य जलवाहिनीवरुन हेदुटणे गाव परिसरात काही चोरीच्या नळ जोडण्या काही व्यावसायिकांनी घेतल्या असल्याचे निदर्शनास आणले आहे. ‘लोकसत्ता ठाणे’च्या प्रतिनिधीने दोन दिवस या भागात भ्रमंती करुन या भागातील चोरीच्या नळ जोडण्या, तेथील हॉटेल्स, ढाबे यांची माहिती संकलीत करुन मंगळवारी वृत्त प्रसिध्द केले होते. त्या वृत्ताची गंभीर दखल एमआयडीसीने घेतली आहे.
राजकीय झूल पांघरुन, दादागिरी करीत हे व्यावसायिक व्यवसाय करीत असल्याने एमआयडीसीचे अधिकारी या धंदेवाल्यांच्या अंगावर जाण्यास घाबरत आहेत किंवा त्यांच्या चोरीच्या कृत्यावर कारवाई करताना बिचकत आहेत. एमआयडीसी अधिकाऱ्याला अनेक वेळा एकटय़ाने जलवाहिनी रस्त्याने बारवी धरणावर जावे लागते. त्यामुळे एमआयडीसीचे अधिकारी या व्यवसायांवर कारवाई करताना घाबरत आहेत.
‘लोकसत्ता ठाणे’ मध्ये बेकायदा व्यवसाय करणाऱ्या सर्व ढाबे, गॅरेज मालकांची नावे प्रसिध्द झाल्याने, त्याचा आधार घेऊन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी अधिक जोराने पालिकेकडे आपल्या गावांच्या हद्दीतील चोरीच्या नळ जोडण्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा