ठाणे : मध्यमवर्गीयांच्या मनात आता रेल्वेच्या बाबतीत राग पेटत आहे. ते आता रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. सकाळच्या वेळेत सर्व प्रवाशी अर्धा तास आधी येऊन रेल्वेस्थानकात फलाटावरच मांडी घालून बसले तर काय होईल, असा इशारा देत बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिला. तसेच वातानुकूलीत लोकल गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा रेल्वे प्रशासन करीत असले तरी हा दावा खोटा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

रेल्वे हा देशातील ऐतिहासिक ‘गेंडा’ आहे. त्यांना ऊन, वारापाऊस, इंजेक्शन वगैरे काही चालत नाही. त्यांच्यावर असरच होत नाही. पुढील आंदोलन हे आपल्या हातात नाही. तर ते जनतेच्या हातात आहे, असेही ते म्हणाले. वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या विरोधातील पहिले आंदोलन हे कळव्यातून सुरु झाले. त्यानंतर बदलापूर आणि ठाण्यात झाले. पण, सर्वाधिक प्रतिसाद हा ठाण्यातून मिळत आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून सुटणारी ९ वाजून ३ मिनिटांची सामान्य रेल्वेगाडी रद्द केली आहे. या रेल्वेगाडीतून सर्व मंत्रालयीन कर्मचारी मुंबईला जायचे. त्याच वेळेवर आता वातानुकूलीत रेल्वेगाडी चालविली जात आहे. वातानुकूलीत १०० रेल्वगाड्या चालवा. पण ज्या गरीबांच्या, नोकरदार वर्गाच्या रेल्वेगाड्या आहेत. त्या सामान्य रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्यांवर अन्याय का करता, अशी विचारणा करत शांत असलेले वातावरण अधिक पेटवले जात असल्याचे ते म्हणाले. वातानुकूलीत रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या बातम्या रेल्वेकडून प्रसारित केल्या जात आहेत. पण, या रेल्वेगाड्यांत नृत्य करता येईल, एवढी ती गाडी रिकामी असते. रेल्वेकडून केला जाणारा चांगल्या प्रतिसादाचा दावा खोटा आहे. कारण एका वातानुकूलीत रेल्वेगाडीतून ५७० प्रवाशी प्रवास करतात, असे रेल्वेने सांगितले होते.  रेल्वेगाडीतील गर्दीमुळे अपघाती मृत्युचे प्रमाण वाढत आहे. माणुसकीशी होणारा हा खेळ आता जर शांतपणे बघणार असू तर आपण राजकारणात राहू नये, असे माझे मत आहे. त्यामुळे मी प्रवाशांची भुमिका मांडतोय. त्यात आपली राजकीय भूमिका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे यांना टोला

देशाच्या राजकारणात उद्ध्वस्त करु, विसर्जन करु असा शब्दप्रयोग कधीही आणि कुणीही केलेला नाही. असे शब्द वापरणाऱ्यांना त्यांचे शब्द लखलाभ असो. पण, आपण त्यांना एवढेच सांगू इच्छितो की ५२ कुळे नाही. एक लाख कुळे जरी उतरले ना, तरी या सह्याद्रीच्या पहाडाला म्हणजेच शरद पवार यांना काहीही फरक पडणार नाही. त्यांच्या पायाच्या नखावरील धूळही तुम्ही उडवू शकणार नाहीत, असे प्रतिउत्तर आव्हाड यांनी बावनकुळे यांना दिले.

Story img Loader