ठाणे शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी मध्यरात्री ऑल आऊट कोंबिग ऑपरेशन केले. अवघ्या दोन तासांच्या या कारवाईत पोलिसांनी १८४ जणांना अटक केली. यामध्ये बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणारे, अमली पदार्थ तस्करी करणारे, जुगार खेळणाऱ्यांचा सामावेश आहे. कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
हेही वाचा >>>कल्याण: सात तासाच्या अथक प्रयत्नानंतरही बिबट्याचा वनाधिकाऱ्यांना गुंगारा
ठाणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिले होते. त्यानुसार, बुधवारी रात्री ११ ते गुरुवारी मध्यरात्री १ वाजेपर्यत ठाणे पोलिसांनी ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ऑल आऊट कोंबिग ऑपरेशन सुरू केले होते. यामध्ये सह पोलीस आयुक्त, तीन अपर पोलीस आयुक्त, सर्व परिमंडळाचे उपायुक्त यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन करून पथके तयार केली. या ऑल आऊट कोंबिग ऑपरेशनमध्ये अवैध शस्त्र जप्ती, अग्नीशस्त्रे जप्ती, फरार आरोपी अटक करणे, उपाहारगृह, डान्सबार, पब, हुक्कापार्लर पॅरोल आदेशाचा उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, वाहने तपासणे, अभिलेखावरील गुंडाचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे अशा प्रकारच्या कारवाईचा सामावेश होता. त्यानुसार, पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या, अवैध अस्थापना चालविणाऱ्या, जुगार खेळणाऱ्या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या, फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली. यात पोलिसांनी १७७ गुन्हे दाखल करून १८४ जणांना अटक केली.
हेही वाचा >>>ठाण्यातील मुख्य मार्ग चकाचक पण, इतर मार्गांवर अस्वच्छता; रस्त्यालगत राडारोड्याचे ढिगारे
मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात आली. यामध्ये विना परवाना वाहन चालविणे, विना शिरस्त्राण वाहन चालविणे, सिग्नल नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्यांचा सामावेश आहे. यात पोलिसांनी १ लाख ८० हजार ५५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.