ठाणे: गणेशोत्सवाच्या काळात मिरवणूकीदरम्यान करण्यात येणारी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या आवाजाचा त्रास माणसांप्रमाणे भटक्या प्राण्यांनाही होत असतो. या आवाजामुळे यंदा शहरातील २० ते २५ प्राण्यांनी दुसऱ्या जागी स्थलांतरण केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये श्वानांची संख्या सर्वाधिक असल्याची बाब ठाण्यातील सिटिझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (कॅप) या संस्थेच्या अहवालातून पुढे आली आहे.
गणपतीला वाजतगाजत निरोप देण्याकडे अनेकांचा कल असतो. गणपती विसर्जना दिवशी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांकडून मिरवणुका काढण्यात येतात. यंदाही ठाणे शहरात दीड दिवसाचे आणि गौरी-गणपती विसर्जना दिवशी ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. यामध्ये ढोल-ताशे, बॅन्जो अशी वाद्य वाजविण्यात आली. तर काहीजण डिजेच्या तालावर थिरकत होते. वाद्य आणि डिजेच्या आवाजामुळे यंदा ध्वनी प्रदुषणात वाढ होऊन आवाजाची पातळी ११० डेसिबल्सवर पोहोचली होती. या आवाजाचा त्रास लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तीना होत असतानाच, आता भटक्या प्राण्यांनाही त्याचा त्रास होताना दिसून येत आहे.
ज्या भागात आवाजाची पातळी सर्वाधिक होती, त्या भागातील श्वान आणि मांजर या प्राण्यांनी दुसऱ्याठिकाणी स्थलांतरण केल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे शहरातील २० ते २५ भटक्या प्राणी आपली वास्तव्याची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत, अशी माहिती सिटिझन्स फॉर ॲनिमल प्रोटेक्शन (कॅप) या संस्थेमार्फत देण्यात आली. उपवन, खोपट, रुणवाल नगर, घोडबंदर रोड, कळवा आणि कोपरी या भागातील हे प्राणी असून कर्णकर्कश आवाजामुळे ते दुसऱ्या जागी स्थलांतरीत झाले आहेत. या भागातील प्राणीप्रेमी भटक्या प्राण्यांना दररोज खाद्य देतात. परंतु अनेक प्राणी नेहमीच्या ठिकाणी नसल्याची बाब प्राणी प्रेमींच्या निदर्शनास आली.
दुसऱ्या भागात गेलेल्या प्राण्यांवर तेथील प्राण्यांकडून हल्ले होत आहेत. या संदर्भात कॅप संस्थेकडे शहराच्या विविध भागातून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामध्ये उपवन पाच, खोपट – रुणवल नगर परिसरातील तीन, घोडबंदर भागातील सात, कळवा सहा आणि कोपरीतील दोन आणि इतर ठिकाणचे काही अशा २० ते २५ तक्रारी आहेत.
श्वानांना १४० डेसीबल्स पेक्षा जास्त आवाजाच्या संपर्कात आल्यास गंभीर त्रास होतो. त्यांना शारिरिक वेदनेसह त्यांची ऐकण्याची क्षमता कमी होते. श्वानांमध्ये ८५ ते १०० डेसीबल्सपर्यंत आवाजाची पातळी सहन करण्याची क्षमता असते, अशी माहिती कॅप संस्थेचे संस्थापक सुशांक तोमर यांनी दिली.
गणपती विसर्जनात नेहमीच मोठ्याप्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असते. यंदा शहरातील आवाजाची पातळी १०० डेसीबल्सवर पोहोचली आहे. याचा त्रास माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही मोठ्याप्रमाणात होत आहे. – डॉ. महेश बेडेकर,सामाजिक कार्यकर्ते