भारतात स्थलांतरित पक्ष्यांना विश्रांतीसाठी उतरण्याच्या अनेक जागा उपलब्ध आहेत. त्यात भरतपूर इतके दिवस अगदी एक नंबरवर होते. नळसरोवर, चिलकासरोवर, तर महाराष्ट्रात कोकणपट्टीतला किनाऱ्याचा बराचसा भाग, मुंबईतील शिवडीजवळील खाडी, अलिबागजवळ अक्षी, भिगवण येथे मोठय़ा संख्येने पक्षी विश्रांतीसाठी उतरतात. गुजरातमधील जामनगर येथे तर येणाऱ्या पक्ष्यांच्या दाणा-पाण्याची सोय तेथील गावातील लोक आपणहून करतात आणि म्हणूनच तेथे दरवर्षी येणाऱ्या पक्ष्यांमध्ये वाढ होत चालली आहे. तेथे माणसांपासून पक्ष्यांना कसलाही उपद्रव होत नाही. त्यामुळे पक्षीसुद्धा माणसांना घाबरून दूर जात नाहीत आणि दुर्बिणीशिवाय नुसत्या डोळ्यांनी ते पाहता येतात.
जेव्हा एखाद्या भागातून स्थलांतर होते आणि पक्षी दुसऱ्या भूभागात निघून जातात तेव्हा ज्या भूभागातून पक्षी गेले तो भाग पक्ष्यांशिवाय काही अगदी ओस पडत नाही. सर्वच्या सर्व अगदी शंभर टक्के पक्षी स्थलांतर करत नाहीत. थंडी वाढायला लागली की, जे पक्षी स्थलांतर करतात त्यात प्रामुख्याने तरुण, वयाने लहान पक्षी असतात. तरुणांच्यात जोश असतो, तर पिलांना स्थानांतराचा अनुभव घ्यायचा असतो, अनेक गोष्टी शिकायच्या असतात, ज्या पुढच्या आयुष्यात, पुढच्या स्थलांतराच्या वेळी उपयोगी पडणार असतात. वयाने मोठे आणि अनुभवी पक्षी मागेच राहतात. एक तर बरीच संख्या स्थलांतरित झाल्यामुळे मागे राहिलेल्या मोठय़ा वयाच्या पक्ष्यांना आहे तो अन्नसाठा पुरेसा होतो आणि समजा थंडी आणखी वाढली किंवा आहे तो अन्नसाठा संपला तर स्वत:च्या पूर्वीच्या अनुभवाच्या जोरावर ते जुनेजाणते पक्षी उशिराने स्थलांतराला सुरुवात करूनही इप्सित स्थळी पोहोचू शकतात. काही भूभागांत असेही आढळले आहे की, फक्त नर-पक्षी तेवढे स्थलांतर करतात आणि माद्या आहे त्याच जागी आपल्या घरटय़ांचे संरक्षण करत राहतात.
Northern Pintail (नॉर्दन पिनटेल) हा पक्षी मध्य आशियातून भारतात येतो. त्यांच्यात नर पिनटेल आधी भोज्जाला पाय लावतात. माद्या स्थलांतर करून येतच नाहीत असे नाही. त्या येतात, पण थोडय़ा उशिराने. पिनटेल हे पाळीव बदकाएवढय़ा आकाराचे जवळजवळ पाच हजार किमीचा प्रवास करून भारतात येणारे एक अतिशय सुंदर बदक आहे.
पिनटेल या नावावरूनच या पक्ष्याच्या शेपटीचे वैशिष्टय़ समजून येते. याची शेपटी लांब आणि टोकदार असते. एकदाच पाहून हा पक्षी आणि त्याचे नाव दोन्ही लक्षात राहते. शेपटीप्रमाणेच लक्षात राहतो तो त्याच्या गळ्यातून निघून मानेवरून सरकत चॉकलेटी रंगाच्या डोक्याच्या मागेपर्यंत लांबलेला पांढरा पट्टा. इतर बदकांच्या तुलनेत उंच मान असणाऱ्या या पक्ष्याची मान त्या निमुळत्या होत जाणाऱ्या पांढऱ्या पट्टय़ामुळे जास्तच उंच दिसते. चॉकलेटी चेहऱ्यावरती असणारा तसाच तपकिरी, काळसर लालसर डोळा फारसा नजरेत भरत नाही; पण शेपटीच्या तलवारी मात्र नजरेतून सुटत नाहीत. आपल्या मराठीत तर याला तलवार-बदक असेच नाव आहे. अर्थात हे सौंदर्य फक्त नर पिनटेलला बहाल झालेले असते. मादीला ना टोकदार लांब शेपटी, ना कापसासारखी पांढरी छाती, ना चॉकलेटी डोके, ना त्यातून जाणारा पांढरा पट्टा; पण अंडी उबवणे, पिलांना जन्म देणे, त्यांचे संगोपन करणे यासाठी आवश्यक ते सर्व गुण म्हणजेच निसर्गाशी सरूपता, ती या पिनटेलच्या मादीत पुरेपूर ठासून भरलेली असते.
मेधा कारखानीस

Story img Loader