ठाणे: गेल्या चार वर्षात दुधाचे भाव लिटर मागे १८ रुपयांनी वाढले असले तरी त्या तुलनेत दुध विक्रेत्यांना कंपनीकडून कमिशन मिळत नसल्याचा आरोप ठाणे शहर दुध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून दुध पिशवीवरील मुळ रक्केवर दहा टक्के कमिशन विक्रेत्यांना देण्याच्या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवस दुध बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे दिवाळीच्या एक दिवस आधीच ठाण्यात दुध बंदी होण्याची चिन्हे असून त्याचा फटका ठाणेकरांना बसण्याची चिन्हे आहेत.
ठाणे शहरात दररोज विविध दुध कंपन्यांमार्फत दहा लाख लीटर इतका दुध पुरवठा होतो. शहरातील सुमारे सातशे दुध विक्रेत्यांमार्फत हे दुध ठाणेकरांपर्यंत पोहचविले जाते. दुध उत्पादक कंपन्या वारंवार दुधाचे दर वाढवित आहेत. या कंपन्या स्वतःचा विचार करतात पण, तेच दुध घरोघरी लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या लहान आणि मोठे दुध विक्रेत्यांचा विचार करीत नाहीत. हे विक्रेते कित्येक वर्षापासून अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये व्यवसाय करीत आहेत. दुधाच्या पिशवीमागे विक्रेत्यांना केवळ दोन टक्के कमीशन मिळत आहे. त्यामुळे हा व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. तसेच दुकानाचे वीज देयक, इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आणि वाढती महागाई यात वाढ झाली असली तरी त्या तुलनेत मात्र कमिशनमध्ये वाढ होत नाही. त्यामुळे दुध विक्री बंद शिवाय पर्याय नसल्याने येत्या शुक्रवारी एक दिवस दुध बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ठाणे शहर दुध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले असून या बंदबाबत त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे पोलिस आयुक्त यांना पत्र दिले आहे.
गेल्या चार वर्षात दुधाचे भाव लीटलमागे १८ रुपयांनी वाढले. पण, आमच्या विक्रेत्यांचे कमिशन वाढलेले नाही. महागाई आणि खर्चामुळे दुध व्यवसाय करणे कठीण झाले आहे. दुध कंपन्यांना नागरिकांवर कोणताही बोजा न टाकता १८ टक्के कमिशन देणे शक्य असून तसा निर्णय कंपन्यांनी घ्यायला हवा. याबाबत वारंवार सूचना देऊनही कंपन्यांनी आतापर्यंत कोणीही दाद दिलेली नाही. त्यामुळे या मागणीसाठीच आम्ही एक दिवस दुध बंद आंदोलन करीत आहोत.
– पांडुरंग चोडणेकर, सह सचिव, ठाणे शहर दुध व्यावसायिक कल्याणकारी संस्था