ऋषिकेश मुळे
पारसिक येथे मिनी क्रूझ दाखल; किनाऱ्यावरील जीवसृष्टीविषयी जाणून घेण्याची संधी
ठाणे खाडीत पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवली जावी, यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून आखलेला सागर सफर पर्यटन प्रकल्प येत्या काही दिवसांत कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. त्यासाठीची मिनी क्रूझ पारसिक खाडीकिनारी तीन दिवसांपूर्वी दाखल झाली. सुविधांनी युक्त असणाऱ्या या प्रशस्त मिनी क्रूझची चाचणी सध्या सुरू आहे. बोट पाहण्यासाठी पारसिक खाडीकिनारी ठाणेकरांची गर्दी होत आहे.
ठाणे महापालिकेने कळव्यासह शहरातील वेगवेगळ्या भागांत वर्षभरापासून खाडीकिनाऱ्यांच्या सुशोभीकरणाची कामे सुरू केली आहेत. पारसिक चौपाटीचे काम वेगाने सुरू असून तिथे ठाणेकरांना खाडी पर्यटनासाठी घेऊन जाणारी मोठी बोट नुकतीच दाखल झाली. ‘एसबी राज सागर’ असे नाव असणारी ही दीड कोटी रुपयांची मिनी क्रूझ (स्पीडबोट) प्रशस्त आहे. गोव्यात बांधणी झालेल्या या बोटीतून एका वेळी ४०-५० जण प्रवास करू शकतील. पूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या बोटीत वरच्या बाजूस एक मजलाही (डेक) आहे. या खुल्या मजल्यावरून सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य पाहता येईल. बोटीत विविध खाद्यपदार्थाची विक्रीदेखील होणार असल्याचे ठेकेदाराने सांगितले. ठाणेकरांना आतापर्यंत मासुंदा आणि उपवन या तलावांमध्येच नौकाविहार करता येत होता. आता या मिनी क्रूझमध्ये बसून खाडीवरील नौकाविहार करता येईल आणि पाणथळीतील जीवसृष्टीही पाहता येईल.
ठाणे खाडीलगत कांदळवने आहेत. शिवाय सीगल आणि रोहित पक्ष्यांचाही इथे अधिवास आहे. या संदर्भातील माहिती पर्यटकांना मिळावी यासाठी मिनी क्रूझवर पर्यटन मार्गदर्शकही नेमण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
सुरक्षेच्या उपाययोजना
एसबी राजसागर मिनी क्रूझला अशा प्रकारची आहे, जिला पाण्याची पातळी केवळ अडीच मीटर असणारा प्रवाह आवश्यक असतो. त्यामुळे भरती आणि ओहोटीमुळे पाणी पातळी कमी-जास्त होत असली, तरी खाडीतील पाण्याचा मिनी क्रूझच्या विहारावर परिणाम होणार नाही, असे खाडी पर्यटनाच्या ठेकेदाराकडून सांगण्यात आले. मिनी क्रूझचा चालक ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा हा परवानाधारक असणार आहे. बोटीवर जीवरक्षक जॅकेट तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अन्य सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या मिनी क्रूझवरून होणाऱ्या खाडी पर्यटनास महाराष्ट्र सागरी मंडळासह ठाणे महापालिका आणि अन्य विभागांच्या मान्यता असणार आहेत.
प्रवासाचा मार्ग
पारसिक चौपाटी येथून पर्यटकांना घेऊन ही मिनी क्रूझ कोलशेत खाडीच्या दिशेने निघेल. खाडी परिसराचे नैसर्गिक सौंदर्य दाखवत ती पुढे मुंब्रा खाडीच्या दिशेने रवाना होईल. साधारण एक तास होणाऱ्या या पर्यटनात पर्यटकांना खाडीवरील विहाराचा आनंद घेता येणार आहे. तिकीटदर लवकरच निश्चित केले जाणार असल्याचे कळते.
मुंबई आणि अलिबागच्या धर्तीवर आता ठाण्यात हा प्रकल्प होत आहे ही ठाणे शहरासाठी अभिमानास्पद बाब आहे. पर्यटकांच्या आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्व सुरक्षा यंत्रणा मिनी क्रूझवर आहेत. सर्वसामान्य ठाणेकरांना या सफरीचा आनंद लुटता यावा हाच मुख्य उद्देश आहे.
– अन्वर कच्छी, खाडी पर्यटन मिनी क्रूझ ठेकेदार