प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. आनंद दिघे यांचा एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता क्षितिश दाते हा या चित्रपटात मंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारत आहे. नुकतंच एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात आनंद दिघेंबद्दल भावूक आठवण सांगितली आहे.
एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले होते. यामध्ये एकनाथ शिंदे आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रसाद ओकला दिघे साहेबांचा भावलेला प्रसंग कोणता असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने या चित्रपटात एकनाथ शिंदेंसोबत दिघे साहेब नरीमन पॉईंटला बसले आहेत. त्यावेळी एकनाथ शिंदे हे प्रचंड दु:खात असतात आणि त्या दुखातून बाहेर पडण्यासाठी आनंद दिघे हे नरीमन पॉईंटला घेऊन जातात आणि कृष्ण अर्जुनने जशाप्रकारे तत्वज्ञान सांगितले होते, त्या पद्धतीचे ज्ञान हे दिघे साहेब शिंदे साहेबांसमोर मांडतात.
यात गुरुशिष्याची परंपरा दाखवण्यात आली आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेब आणि दिघेसाहेब एकनाथ शिंदे साहेब ही गुरु शिष्य परंपरा जी चालत आली आहे, त्या परंपरेला अधोरेखित करणारा तो एक महत्त्वाचा सीन आहे. हा माझा सर्वात आवडता किंवा लाडका सीन आहे, असे तो सांगतो.
“माझ्या आयुष्यातील तो सर्वात काळा दिवस“
धर्मवीर चित्रपटातील या प्रसंगावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “माझ्या आयुष्यातील तो सर्वात काळा दिवस होता. मला ती आठवण आठवली तरी फार अवघड होतं. त्यावेळी माझ्या दोन मुलांचा गावी अपघात झाला होता. यानंतर माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. माझी मुलं बोटिंग करण्यासाठी म्हणून गेली होती. पण त्यावेळी एक दुर्घटना घडली आणि त्यात दोन्हीही मुलांचा मृत्यू झाला. त्यावेळी माझा मुलगा श्रीकांत हा फक्त १४ वर्षांचा होता. २ जून २००० मध्ये ही घटना घडली. त्यावेळी दिघे साहेब हे एक दिवसआड माझ्याकडे यायचे. त्यांनी एकदा मला काय करतो असा प्रश्न विचारला. त्यावर मी काही नाही साहेब, आता सर्वच संपलंय असं हताश होऊन उत्तर दिले.”
“त्यावेळी दिघे साहेब मला म्हणाले असं करु नको. त्यांनी मला त्यातून सावरलं. त्यामुळे आज मी तुमच्यासमोर आहे. त्यावेळी ते मला म्हणाले होते, तुझे कुटुंब लहान नाही तर मोठं आहे. लोकांसाठी काम कर. त्यावेळी त्यांनी मला त्यावेळी ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली होती. मी कामात व्यस्त राहावं असा त्यामागचा उद्देश होता. त्यावेळी मी ठाणे महापालिकेच्या सभागृहाचा नेता होतो. मात्र ते मला कल्याण, अंबरनाथ आणि इतर जिल्ह्यात पाठवायचे. ते कार्यकर्त्यांना सांगायचे मी येत नाही म्हणून एकनाथला पाठवत आहे. त्यावेळी कार्यकर्तेही माझं जल्लोषात स्वागत करायचे. साहेब मला अशीच काम द्यायचे जी अवघड असायची. मात्र मी ती काम पूर्ण करायचो”, अशी आठवण एकनाथ शिंदेंनी सांगितली.
यानंतर प्रसाद ओकने प्रवीण तरडेची माफी मागत चित्रपटातील या संवादादरम्यानचा डायलॉग सांगितला. ”एकनाथ ही वेळ महत्वाची आहे. तुझे डोळे कोरडे ठेवून लोकांचे ओले डोळे पूस, लोकांचा लोकनाथ हो. अनाथांचा एकनाथ हो.” असा तो डायलॉग आहे.