ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याची घोषणा करत वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षाची कोंडी करण्यास सुरूवात केल्याचे चित्र असतानाच, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपचे वर्चस्व असलेल्या पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेण्याची घोषणा शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांमध्ये शहकाटशहाचे राजकारण रंगल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्हा हा शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या जिल्ह्यात वर्चस्व राहिलेले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते ठाणे जिल्ह्यात कमालीचे सक्रीय झाले आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांच्याक़डे भाजपने ठाणे जिल्हा संपर्क पदाची जबाबदारी दिली आहे तर, माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रदेश कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यामागेही मोठी ताकद उभी केली जात आहे. अशातच वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे शहरात जनता दरबार घेण्याची घोषणा करत २४ फेब्रुवारी रोजी त्याचे आयोजनही केले आहे. यावरून शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नेत्यांमधून प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना दरबारी राजकारण केले नसल्याचे म्हटले होते. या विधानाच्या माध्यमातून त्यांनी नाईक यांना टोला लगावल्याची चर्चा आहे. भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन केले आहे. एकूणच भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांमध्ये शहकाटशहाचे राजकारण रंगले असतनाच, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपचे वर्चस्व असलेल्या पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेण्याची घोषणा शनिवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली.

महायुती ही फेविकॉलचा जोड आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे तिन्ही पक्षाच सरकार खंबीरपणे राज्याच नेतृत्व करत आहे. राहिला प्रश्न जनता दरबारचा. गणेश नाईक हे पालकमंत्री असताना सर्वच ठिकाणी जनता दरबार घ्यायचे. त्यामुळे पक्ष संघटना वाढवण्यासाठी किंवा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणता मंत्री जनता दरबार घेत असेल तर, त्यात काय चुकीचे असा प्रश्न सरनाईक यांनी उपस्थित केला. भाजप पक्षाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे हे आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबवत आहेत. परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धत मात्र वेगळी आहे. जनता दरबार या भानगडीत पडण्याऐवजी ते सर्वसामान्य माणसांचे प्रश्न त्यांच्यामध्ये जाऊन कसे सोडवता येतील, यावर लक्ष देतात, असा टोलाही त्यांनी लगावला. ठाणे जिल्ह्याच्या बाजूला पालघर जिल्हा आहे. मी राज्याचा मंत्री आहे. त्यामुळे मी सुद्धा पालघर मध्ये जाऊन जनता दरबार घेऊ शकतो आणि तसे मी करणारच आहे. कारण, मला पक्ष संघटना वाढवायची आहे. लोकांची कामे करायची आहेत, असेही ते म्हणाले.

परिवहन सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न

धाराशीव येथे एका कार्यक्रमाला गेलो असता, काही पत्रकारांनी मला मोफत बस प्रवासाची सवलत देण्याची मागणी केली. परंतु मी त्यांना सांगितले की, परिवहन सेवेची आजची परिस्थिती पाहिली तर आमच्या लाडक्या बहिणींना बस तिकीटात ५० टक्के मोफत सवलत आहे. ७५ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत आहे. समाजातील इतर घटकांना सवलत आहे. मोफत सवलत आणि टक्क्यांनुसार काही सवलत आपण दिल्या आहेत आणि पुन्हा पत्रकारांनाही सवलती दिल्या तर राज्यातील इतरही पत्रकार त्यामध्ये येतील. प्रत्येकाला जर सवलत देत सुटलो. तर परिवहन सेवा चालविणे कठीण होऊन जाईल. त्यामुळे यापुढे सवलती देता येणार नाही, असे मंत्री सरनाईक म्हणाले.

महिलांना आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे आमचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात ज्या घोषणा केल्या आहेत, त्यापैकी एकही योजना आम्ही बंद करणार नाही. परंतू यापुढे मात्र नवीन सवलती देता येणार नसून असे वक्तव्य मी केले होते. त्या मताशी मी आजही ठाम आहे, असेही ते म्हणाले. कुठलीही परिवहन सेवा सक्षम नसते. प्रत्येक परिवहन सेवा ही तोट्यातच जात असते. पण एवढा ही तोटा होऊ नये, जेवढा तीन कोटी तोटा प्रत्येक दिवसाला महाराष्ट्राच्या परिवहन सेवेला होतो. राज्यसरकारचे कर्तव्य असते परिवहन सेवेला चालवणे. कारण ही लोकांना सुविधा द्यायची असते. परंतु वारंवार कामगारांच्या पगारासाठीही राज्य शासनाकडे हात पसरावे लागू नये अशा पद्धतीची परिवहन सेवा सुरळीत करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सरनाईक म्हणाले.

Story img Loader