ठाणे – जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याच पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व अतीधोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे. त्यांची व्यवस्था समाज मंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळा तसेच यांचीही कमतरता भासल्यास मंगल कार्यालयांमध्ये करण्यात यावी. अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळांमध्ये सुसूत्रता आणावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थिती व त्यावरील उपाययोजना याविषयीची आढावा बैठक शनिवारी ठाणे जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
हेही वाचा >>> आसनगाव रेल्वे स्थानकात मालगाडी खालून जाताना महिला गंभीर जखमी
आपत्तीचा कोणताही प्रसंग उद्भवल्यास त्या ठिकाणी नागरिकांना तातडीने मदत पोहोचण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा आढावा घेऊन त्याविषयी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात. आरोग्य विभागाने साथीचे रोग पसरू नयेत, याची सर्वोतोपरी काळजी घ्यावी. आपत्ती प्रसंगी नागरिकांना सुखरूपपणे राहता यावे, याकरिता जी निवारा केंद्र स्थापित करण्यात आलेली आहेत, ती निवारा केंद्र सुस्थितीत असल्याची खात्री करावी तसेच त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा असाव्यात, याकडेही लक्ष देण्याचा सूचना यावेळी त्यांनी केल्या. त्याचबरोबर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजसंबंधी उद्भवणाऱ्या अडचणींना तात्काळ प्रतिसाद द्यावा. आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता कायम सज्ज ठेवावी,असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांप्रमाणे नदी खोलीकरण, निवारा केंद्रांची दुरुस्ती, साकव दुरुस्ती इत्यादी विषयांबाबतच्या कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने शासनाकडे पाठवावेत. शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात सध्या ३५० स्थलांतरित नागरिक तात्पुरत्या निवारा केंद्रात राहत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा >>> ठाणे शहरात रविवारपर्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा
तुमच्या मुळे महाराष्ट्राला निधी मिळाला नाही – शंभूराज देसाई
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी माध्यमातून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना शंभुराज देसाई म्हणाले की ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जात आहे यामुळे महाराष्ट्राला विकास कामांसाठी भरीव निधी मिळत आहे. तुमच्यासारखे कडकसिंग बनून ते घरात बसून राहिले नाही. तुम्ही कधीही महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन दिल्लीला गेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राला विकास कामांसाठी तुमच्या कालावधीत निधी मिळाला नाही’. अशी टीका त्यांनी यावेळी केली. आदित्य ठाकरे यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसत आहे. यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कालावधीत महाराष्ट्रात किती नवीन योजना आल्या आणि त्यांची कशी अंमलबजावणी झाली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालावधीत महाराष्ट्रात किती नवीन योजना आल्या आणि त्याची कशी उत्तम प्रकारे अंमलबजावणी होत आहे.याबाबत देखील विचार करायला हवा, असेही देसाई यावेळी म्हणाले. महायुती मध्ये संख्याबळावरून कोणताही वाद नाही. येणाऱ्या निवडणुका शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र मिळून लढवणार आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.