ठाणे : महिला दिनानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असतानाच, भिवंडीत एका १० वर्षीय मुलीचा परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने विनयभंग केला. तर दुसऱ्या एका प्रकरणात २४ वर्षीय महिलेला विवाहाचे अमीष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी शांतीनगर आणि गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
यातील पहिली घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पिडीत मुलगी १० वर्षीय असून तिच्या आई-वडिलांसोबत भिवंडीतील एका भागात राहते. त्याच परिसरात ४० वर्षीय व्यक्ती वास्तव्यास आहे. तिचे आई-वडिल ६ मार्चला रात्री १२ वाजता त्यांच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी बाहेर गेले होते. यावेळी त्यांनी मुलीला ४० वर्षीय व्यक्तीकडे सोपविले होते. पिडीत मुलीचे पालक घरी आल्यानंतर तो व्यक्ती तेथून निघून गेला. परंतु मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे त्यांनी पिडीत मुलीला विचारले असता, तिने घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईने तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, शांतीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिला २०२३ चे कलम ७४ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ आणि १२ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तर दुसरे प्रकरण गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पिडीत २४ वर्षीय मुलीला तिच्या मित्राने विवाहाचे अमीष दाखवून तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीतील गणेशपुरी भागात घडल्याने गणेशपुरी पोलीस ठाण्यात हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.