भाईंदर : मीरा भाईंदर शहरात मराठी पाट्यांच्या सक्तीबाबत महापालिकेकडून कोणतेच पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे या अमराठी पाट्या बदलण्याबाबत दुकानदारांकडून देखील कानाडोळा करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत, ठळक अक्षरात नाम फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी न्यायालयाने दुकानदारांना दिलेली दोन महिन्याची मुदत देखील संपुष्टात आली आहे. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रत्यक्ष दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तर इतर महापालिकेने तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी आपआपल्या शहरात दुकानदारांना त्वरित मराठी पाट्या लावण्याचे निर्देश दिले आहेत.
मात्र या संदर्भात मीरा भाईंदर शहरात कोणत्याही हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी शहरात मराठी पाट्यांची सक्ती करावी यासाठी मनसे आणि मराठी एकीकरण समितीने पालिकेकडे आक्रमक मागणी केली होती.मात्र शहरात कमी असलेली मराठी नागरिकांची संख्या आणि प्रशासनाच्या थंड धोरणामुळे हे काम होत नसल्याचे आरोप केले जात आहे.
कारवाईची तयारी सुरु असल्याचा पालिकेचा दावा
मीरा भाईंदर शहरात मराठी पाट्यांबाबत दुकानदारांना सक्ती करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.यात जवळपास दीडशे दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याबाबत नोटीसा बजावून मुदत देण्यात आली आहे.तसेच येणाऱ्या दिवसात सहाय्यक आयुक्त प्रभाग अधिकारी,सहाय्यक आयुक्त परवाना आणि सहाय्यक आयुक्त कर निरीक्षक यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले असून लवकरच दंडात्मक कारवाईस सुरुवात केली जाईल, अशी माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली आहे.