भाईंदर : बोरीवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गीका टाकण्याचे काम केले जाणार आहे. या कामात मीरा भाईंदर मधील जवळपास दोनशे झाडे बाधित होणार आहे. त्यामुळे ही झाडे कापण्यासाठी रेल्वे विभागाने महापालिकेपुढे प्रस्ताव पाठवला आहे. यावर वृक्ष प्राधिकरणाची बैठक घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी व सहावी मार्गीका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जागा हस्तांतरण, अतिक्रमण कारवाई आणि अस्तित्वात असलेली झाडे मोकळी करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.
हेही वाचा : सरकारी अधिकारी अनिल गायकवाड यांच्या मुलासह तिघांना जामीन, पीडित तरुणीनी मागणार उच्च न्यायालयात दाद
त्यानुसार मीरा रोड आणि भाईंदर अश्या दोन रेल्वे स्थानाकांमध्ये जवळपास दोनशे झाडे बाधित होणार असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे ही झाडे कापण्याची परवानगी मिळावी म्हणून रेल्वे महामंडळाने महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार महापालिकेच्या पर्यावरण विभागाने या झाडांची पाहणी करण्याचे काम हाती घेतले आहेत.यात ही झाडे कापत असताना त्या मोबदल्यात किती झाडांचे पुनर्रोपन करावे आणि रेल्वे प्राधिकरणाला किती पैसे आकरावे आदी गोष्टीचा समावेश आहे.त्यांनंतर हा अहवाल महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीपुढे सादर करून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : डोंबिवली ब्राह्मण महासंघाच्या फलकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा नसल्याने चर्चांना उधाण
“रेल्वे विभागाकडून जवळपास दोनशे झाडे विकास कामात बाधित होत असल्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे यावर सविस्तर माहिती घेऊन तो निर्णय घेण्यासाठी वृक्ष प्राधिकरण समितीपुढे सादर केला जाईल.” – योगेश गुणीजन, सहायक आयुक्त ( पर्यावरण विभाग )