नगरविकास विभागाचा प्रस्ताव
शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या स्वतंत्र प्रकल्पाचे काम अद्याप मार्गी लागत नसल्याने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मीरा-भाईंदर व वसई-विरार महानगरपालिकेने एकत्रितरीत्या प्रकल्प राबवावा, असा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास विभागाने दिला आहे. मीरा-भाईंदरसह वसई-विरार महापालिकेने यास तयारी दर्शवली असून त्या दिशेने संपूर्ण तयारी केली आहे. शासनाकडून याबाबत अधिकृतरीत्या आदेश प्राप्त झाले की पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
उत्तन येथील घनकचरा प्रकल्प स्थलांतरित करायचा असल्याने हा प्रकल्प वसई तालुक्यातील सकवार येथे सुरू करण्याची तयारी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने केली होती. परंतु प्रकल्प सुरू करण्यात या ठिकाणी अनंत अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. स्थानिकांचा विरोध, जागा महापालिकेच्या नावावर न होणे, वन विभागाची परवानगी प्राप्त न होणे अशा विविध कारणांमुळे हा प्रकल्प सकवार येथे सुरू होणे अशक्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वसई-विरार महानगरपालिकादेखील स्वत:चा घनकचरा प्रकल्प उभारणीच्या तयारीत आहे.
या पाश्र्वभूमीवर शासनाच्या नगरविकास विभागाने मीरा-भाईंदर व वसई-विरारलगतच्या महापालिकांनी एकत्रितरीत्या घनकचरा प्रकल्प राबवावा, अशा सूचना दिल्या आहेत. सर्वच महापालिकांना, कचरा प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जागेची असलेली वानवा, स्थानिकांचा विरोध आदी समस्या भेडसावत असल्याने नगरविकास विभागाने विविध महापालिकांना असे प्रस्ताव दिले आहेत. या प्रस्तावानुसार मीरा-भाईंदर महानगरपालिकेने सकवारसाठी सुरू केलेली प्रक्रिया तूर्तास स्थगित केली असून वसई-विरारसोबत प्रकल्प राबविण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली आहे. दोन्ही महापालिकांची तयारी पूर्ण झाली की कचरा प्रकल्प कोणत्या पद्धतीवर आधारित राबवायचा याचे मार्गदर्शन नगरविकास विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
एकत्रित प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने वसई-विरार महानगरपालिकेची पूर्ण तयारी झाली आहे. शहरात नेमका कचरा किती निर्माण होतो हे पाहण्यासाठी इलेक्ट्रॉनिक काटय़ाने शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची मोजणी करण्यात आली आहे. वसई-विरार महापालिकेच्या धर्तीवर मीरा-भाईंदर महपालिकेनेदेखील कचऱ्याची शास्त्रोक्त मोजणी करून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
– सतीश लोखंडे, आयुक्त, वसई-विरार महापालिका
वसई-विरार महापालिकेने दिलेल्या सूचनांनुसार मीरा-भाईंदर महापालिकेने अद्ययावत माहिती तयार ठेवली आहे. कोणत्या प्रकारच्या कचऱ्याचे किती प्रमाण आहे, त्याची उपयुक्तता आदी अहवाल तयार आहेत.
– डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका