Mira Bhayandar candidate Geeta Jain: मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने माजी आमदार नरेंद्र मेहता यांना तिकीट दिल्यामुळे अपक्ष आमदार गीता जैन यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. काल रात्रीपर्यंत गीता जैनचे नाव चर्चेत होते. दिल्लीपासून प्रदेश पातळीपर्यंत माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मी पक्षासाठी गुवाहाटीपर्यंत गेले होते. पण तरी पक्षाने माझे तिकीट कापले.
अशी काय अडचण होती की, पक्षाने माझे तिकीट नाकारले, याची मला कल्पना नाही. कारण अनेकजण म्हणतात की, तिकीट विकत घेतले. एका दिवसापूर्वीपर्यंत मला आश्वासन देऊनही तिकीट नाकारण्याचे कारण अद्याप समजलेले नाही. ज्या उमेदवाराची प्रतिमा स्वच्छ नाही. ज्याच्यावर इतके गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच ज्याचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे, अशा उमेदवाराला जर तिकीट दिले तर पक्षाची कोणती प्रतिमा तुम्ही जनतेसमोर घेऊन जात आहात? असा सवाल गीता जैन यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले?
नरेंद्र मेहता यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाकडून कुणी संपर्क साधला का? याबाबत प्रश्न विचारला असता गीता जैन म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यांची काही अडचण होती, त्यामुळे पक्ष मला तिकीट देऊ शकला नाही. पण माझी निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे. मीरा रोडमधील रिक्षावाले, बिल्डर, गृहिणी, युवा आणि विद्यार्थ्यांना आपल्या भवितव्याची चिंता असेल तर त्यांनी विचार करून मतदान करावे.
हे शहर भ्रष्टाचाऱ्याच्या हातात द्यायचे की स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्याच्या हातात द्यायचे, हे जनता ठरवेल, असेही गीता जैन म्हणाल्या.
महायुती मध्ये नाराजी
माजी आमदार नरेंद्र मेहता यांना भाजपमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुती मध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात भाजप मधील विधानसभा प्रमुख रवी व्यास गट यावर नाराज झाला असून निर्णयाचा विरोध करू लागला आहे. तर अजूनही व्यास यांनी यावर आपली भूमिका जाहीर केलेली नाही. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने या निर्णयाला संमती दर्शवलेली नाही. याशिवाय गीता जैन यांनी देखील बंड पुकारल्याने ही जागा निवडून आणणे महायुतीला आव्हानात्मक ठरणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd