भाईंदर : विद्यार्थाना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावा, यासाठी मीरा-भाईंदर शहरात पहिल्यांदाच तयार करण्यात येत असलेल्या अभ्यासिकेत उद्घाटनापूर्वीच बांधकामातील त्रुटी दिसू लागल्या आहेत. मीरा-भाईंदर शहरातील अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. परंतु, बहुतांश विद्यार्थाना आर्थिक आणि इतर परिस्थितीमुळे अभ्यास करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची सोय व्हावी, म्हणून शहरात प्रथमच स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारण्याची संकल्पना माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी मांडली होती. त्यासाठी मीरा रोड येथे असलेल्या अप्पासाहेब धर्माधिकारी समाज हॉलच्या गच्चीवर ही अभ्यासिका उभारण्यासाठी त्यांनी आपला निधी दिला होता. त्यानुसार मागील वर्षभरापासून या अभ्यासिकेचे काम केले जात असून ते अंतिम टप्प्यात आले आहे.
मात्र, आता अभ्यासिकेत उभारण्यात आलेल्या पत्र्यांची गुणवत्ता योग नसल्याचा आक्षेप गेहलोत यांनी घेतला आहे. यात हे पत्रे ध्वनिप्रतिरोधक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना बाहेरील आवाजाचा समाना करावा लागण्याची शक्यता आहे. शिवाय या पत्र्यामुळे उन्हाळय़ात प्रचंड उष्णता जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थाना चांगल्या सुविधा देण्यासाठी या पत्र्याऐवजी चांगली गुणवत्ता असलेले (टेन्सिल शीटचे) पत्रे लावण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.