सत्ताधाऱ्यांसोबत संघर्षांत आयुक्तांचा बळी

मीरा- भाईंदर महानगरपालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यात सुरू असलेल्या संघर्षांत अखेर सत्ताधाऱ्यांचा विजय झाला आहे. विद्यमान आयुक्त गीते यांची बदली झाली आहे. त्यामुळे अवघ्या दीड वर्षांत बदली होणारे गीते हे मिरा-भाईंदरचे पाचवे आयुक्त ठरले आहेत.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत २०११ नंतर एकही आयुक्त त्यांचा नियोजित कालावधी पूर्ण करू शकलेला नाही. विद्यमान आयुक्त डॉ. नरेश गीते यांचे सत्ताधारी भाजप आणि विशेष करून मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी खटके उडाल्यानंतर संघर्ष तीव्र झाला होता. आयुक्त काम करीत नसल्याचा थेट आरोप नरेंद्र मेहता यांनी केला होता. परंतु आपण शासनाने आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच काम करणार असून कोणत्याही नियमबाह्य़ कामांना साथ देणार नाही, असे गीते यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले होते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी आपली दालने बंद करून महापालिकेत येणे बंद केले होते.

महापौरांसह ११ पदाधिकाऱ्यांनी आपली दालने बंद करण्याचा राज्यातील पहिलाच प्रकार होता. गेल्या आठवडय़ातील स्थायी समितीची सभादेखील यामुळे स्थगित करण्यात आली होती. स्थायी समितीच्या निर्णयाअभावी अनेक विकासकामे ठप्प होण्याच्या मार्गावर होती. तसेच आगामी अर्थसंकल्पावरही या संघर्षांचे सावट पडले होते. या वादात कोणताही तोडगा निघत नसल्याने आणि आयुक्त बधत नसल्याने सत्ताधाऱ्यांनी अखेर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच साकडे घातले होते.

गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेची एक फेरीदेखील पार पडली होती. अखेर सोमवारी गीते यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. त्यामुळे या वादात अखेर सत्ताधाऱ्यांचा विजय झाला आणि आयुक्तांचा बळी गेला असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.

सातत्याने बदली

२०११ नंतर सातत्याने आयुक्तांची बदली करण्यात येत आहे. २०११ साली आलेले विक्रमकुमार हे थेट आयएएस अधिकारी होते. त्यांच्या करडय़ा शिस्तीने महापलिकेचा गाडा रुळावर आला होता परंतु त्यांची दीड वर्षांतच बदली झाली. त्यांच्यानंतर आलेले सुरेश काकाणी, सुभाष लाखे आणि अच्युत हांगे यांची देखील दीड वर्षांच्या कालावधीतच बदली करण्यात आली. आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर महापालिकेची कामकाजाची पद्धत समजावून घेण्यात काही काळ जातो. त्यानंतर आयुक्त या पदावर स्थिरावत असतानाच आणि लोकप्रतिनिधींना कशा पद्धतीने सामोरे जायचे याचे धडे मिळत नाहीत तोच आयुक्तांची बदली करण्यात येत आहे. आयुक्तांच्या सातत्याने होणाऱ्या बदलीचा शहराच्या विकासकामांवर मात्र परिणाम होत आहे.