मीरा-भाईंदर महानगरपालिकेची निवडणूक पार पडून भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता महापालिकेत स्थापन केली आहे. महापालिकेच्या इतिहासात एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच भाजपने निवडणुकीआधी नागरिकांची मते जाणून तयार केलेल्या संकल्पचित्र या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची येत्या पाच वर्षांत पूर्तता करण्याची मोठी जबाबदारी आता या पक्षावर आहे.

महापालिकेत आजपर्यंत युती आणि आघाडीची सत्ताच स्थापन झाली आहे. २००२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर महापालिकेची पहिली निवडणूक पार पडली. त्या वेळी नव्यानेच स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने दोन्ही पक्षांची आघाडी झाली. २००७ मध्ये महापालिकेतील पहिल्या अडीच वर्षांचा अपवाद वगळला तर २०१४ पर्यंत काँग्रेस आघाडीनेच महापालिकेत राज्य केले. २०१४ मध्ये पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेना युतीने महापालिकेत आपली सत्ता स्थापन केली. युती अथवा आघाडीची सत्ता असली की कोणत्याही एका पक्षाला स्वतंत्रपणे काम करता येत नाही. त्यामुळेच निर्णयप्रक्रियेवर मर्यादा येत असतात; परंतु या वेळी प्रथमच भाजपने महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले असल्याने भाजपला आपली ध्येयधोरणे राबविणे शक्य होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपने मतदारांना विकासकामांची पूर्तता करण्याची दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी भाजपवर आहे.

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या जाहीरनाम्यांद्वारे विविध आश्वासने देत असतात. भाजपनेदेखील आपला जाहीरनामा संकल्पचित्र या नावाने जाहीर केला होता; परंतु जाहीरनामा तयार करताना पक्षाने नक्की केलेल्या ध्येयांसोबत नागरिकांकडून आलेल्या सूचनांनाही भाजपने जाहीरनाम्यात स्थान दिले होते. यासाठी भाजपने मोठा गाजावाजा करीत ‘मेरा शहर, मेरा सुझाव’ हे अभियान राबवले, त्याची मोठी प्रसिद्धीदेखील केली. या अभियानाद्वारे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावरच्या उपाययोजना याबाबतच्या सूचना नागरिकांकडून मागवल्या होत्या. यासाठी पक्षाने शहरातील प्रमुख सार्वजनिक ठिकाणांवर सूचनापेटीदेखील ठेवली होती. या पेटीत आपल्या सूचना टाकण्याचे आवाहन भाजपने मतदारांना केले होते. त्याचसोबत भाजपचे कार्यकर्ते दारोदारी फिरून नागरिकांकडून सूचनाही गोळा करीत होते.

या अभियानातून भाजपकडे तब्बल ८५ हजार नागरिकांनी आपल्या सूचना पोहोचवल्या. यातल्या काही प्रमुख सूचनांचा अंतर्भाव भाजपने आपल्या संकल्पचित्रात केला आहे आणि सत्तेवर येताच नागरिकांच्या सूचनांची पूर्तता करण्याची घोषणाही भाजपने केली आहे. आता या सूचना किती पूर्ण केल्या जातात याकडे सर्वाचेच लक्ष लागून राहणार आहे. नागरिकांनी सुचवलेल्या प्रमुख सूचनांमध्ये शहरातील खड्डेमुक्त आणि मजबूत रस्त्यांचा समावेश आहे. सध्या शहरातील विविध रस्त्यांची झालेली अवस्था पाहता नागरिकांनी व्यक्त केलेली ही अपेक्षा रास्तच म्हणावी लागेल. रस्त्यांची सध्याची झालेली दुर्दशा ही केवळ पावसाळ्यातच आढळून येते अशातला भाग नाही, तर एरवीदेखील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आढळून येत असतात. त्यामुळेच शहरातील रस्ते मजबूत असणे ही नागरिकांनी व्यक्त केलेली माफक अपेक्षा आहे.

मीरा-भाईंदरमधील बहुतांश जमीन खाजणाची आणि दलदलीची आहे. बहुतेक रस्ते या दलदलीच्या जमिनीत मातीची भरणी करून तयार करण्यात आले आहेत. परंतु रस्ते तयार करताना त्याचा पाया मजबूत तयार केला जात नसल्याने अनेक रस्ते काही काळातच खचतात, त्याला खड्डे पडतात. यासाठी रस्त्याचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाईंदर ते काशिमीरा हा रस्ता. हा रस्ता तयार करण्याआधी या रस्त्याचा संपूर्ण भाग खोदून काढून त्याचा पाया आधी मजबूत करण्यात आला आणि मगच त्याचे डांबरीकरण करण्यात आले. गेल्या पंधरा वर्षांत रस्ता अनेक ठिकाणी खोदण्यात आल्याने काही ठिकाणचा भाग वगळता हा रस्ता आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. हीच पद्धत रस्तेबांधणीसाठी वापरणे आवश्यक आहे आणि असे झाले तरच शहरातील रस्ते दीर्घकाळ टिकून राहतील.

मजबूत रस्त्यांसोबतच फेरीवालेमुक्त रस्तेही लोकांनी अपेक्षिले आहेत. यासाठी ठिकठिकाणी बाजारांची निर्मिती करण्याच्या सूचना नागरिकांनी दिल्या आहेत. आज शहरातले अनेक मुख्य रस्ते फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्रांची विभागणी केलेली असतानाही अनेक ठिकाणी रस्ते अडवून अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पदपथही फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. परिणामी वाहतूक कोंडीचा सामना तर करावा लागतोच, शिवाय नागरिकांनाही रस्त्यावरून चालताना प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे फेरीवाल्यांसाठीचे धोरण महापालिकेने अद्याप निश्चित केलेले नाही, तसेच ठिकठिकाणी बाजार व्यवस्थाही उपलब्ध केलेली नाही. त्यामुळे फेरीवाले जागा मिळेल त्या ठिकाणी आपले बस्तान बसवत आहेत. महापालिकेच्या विकास आराखडय़ात ठिकठिकाणी बाजाराच्या जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. परंतु आजपर्यंत त्या ताब्यात घेऊन विकसित झाल्या नाहीत, त्यामुळे फेरीवाल्यांना शिस्त लागलेली नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात नवीन बाजारांच्या इमारती विकसित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून, त्यांना ओळखपत्रे देऊन आणि त्यांचे बाजाराच्या इमारतीत स्थलांतर करून रस्ते केवळ पादचारी आणि वाहनांसाठी खुले करण्याचे आव्हान आता भाजपसमोर आहे.

मतदारांच्या अपेक्षा

भ्रष्टाचारमुक्त कारभाराचीदेखील नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. मी खाणार नाही आणि कोणाला खाऊ देणार नाही अशी घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. त्यामुळे किमान पंतप्रधानांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महापालिकेत स्वच्छ आणि पारदर्शी कारभार भाजपने करावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याव्यतिरिक्त शहर स्वच्छता, मुंबई आणि ठाण्याला जाण्यासाठी पर्यायी रस्ते, नाटय़गृह, वाहतूक व्यवस्था आदी अनेक सूचना नागरिकांनी सुचविल्या आहेत. या सर्व महत्त्वाच्या सूचनांचा आदर करून त्यावर तातडीने अंमलबजावणी सुरू करणे हे आता सत्ताधाऱ्यांचे आद्यकर्तव्य असणार आहे. सत्ताधारी आणि प्रशासन यांनी इच्छाशक्ती दर्शवली तर नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणे फारसे अवघड नाही.

@suhas_news