मीरा-भाईंदर महापालिकेच्या आयुक्तांचे आदेश
मीरा-भाईंदरमधील गटारावरील तुटलेली झाकणे बदलण्याचे आणि ज्या गटारांवर झाकणे नाहीत, तिथे बसविण्याचे काम आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी दिले आहेत. या गटारांवरील झाकणे निकृष्ट दर्जाची असल्याचे प्रकरण नुकतेच महापौर गीता जैन यांनी उजेडात आणले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनाने हे आदेश दिले. झाकणांच्या दर्जाबाबतही चौकशी करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरातील गटारांवर बसविण्यात आलेली झाकणे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून अवघ्या एका वर्षांतच ती तुटून पडत आहेत, असा गौप्यस्फोट खुद्द महापौर गीता जैन यांनी केला होता. नालेसफाईच्या कामाच्या पाहणीदरम्यान ही बाब समोर आली असल्याचे महापौरांचे म्हणणे होते.
झाकणांच्या दर्जाबाबत मोठा घोटाळा करण्यात आला असल्याने अनेक ठिकाणची गटारे उघडी आहेत. पावसाळ्यात शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली जात असल्याने झाकणे नसलेल्या अथवा गटारावरील तकलादू झाकणांवर पाय पडला तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. याआधी अशा घटना घडल्या असल्याचे वृत्त लोकसत्ताच्या शनिवारच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची आयुक्त अच्युत हांगे यांनी दखल घेतली. गटारावर अनेक ठिकाणी झाकणे नसल्याच्या तक्रारी आपल्याकडेही प्राप्त झाल्या असून ही बाब गांभीर्याने घेण्यात येईल. आपण स्वत: यात लक्ष घालून शहरातील सर्व ठिकाणच्या गटारांवर येत्या आठ दिवसांत चांगल्या दर्जाची झाकणे बसवली जातील याची दक्षता घेऊ तसेच निकृष्ट दर्जाच्या झाकणांबाबतही चौकशी करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.