उत्तन हा बहुसंख्य ख्रिस्ती कोळी मतदारांचा प्रभाग. माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांच्या कायम पाठीशी उभा रहाणारा हा प्रभाग. मात्र मेन्डोन्सा यांच्यासाठी आजपर्यंत काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनीच मेन्डोन्सा यांची साथ सोडत भाजपचा रस्ता धरल्याने भाजपला या प्रभागात चांगली ताकद मिळाल्याचे मानले जात आहे. एमएमआरडीएच्या आराखडय़ाला उत्तनवासीयांचा तीव्र विरोध असल्याने आंदोलनकर्ते प्रा. संदीप बुरकेन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदा येथे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

प्रभाग क्रमांक २४ मध्ये डोंगरी, धारावी, चौक, पाली, उत्तन या परिसराचा समावेश होता. पूर्वीचे २५ आणि २६ हे प्रभाग एकत्र करून आता २४ क्रमांकाचा प्रभाग तयार झाला आहे. मात्र नवा प्रभाग तयार होत असताना येथील नगरसेवकांची संख्या मात्र घटली आहे. गेल्या निवडणुकीत या परिसरासाठी ४ नगरसेवक होते. या चारपैकी ३ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच मेन्डोन्सा समर्थक होते आणि एक नगरसेविका काँग्रेसची होती, परंतु नव्या प्रभाग रचनेत या ठिकाणी आता तीनच नगरसेवक आहेत.

उत्तन भागात मासेमारी हा उपजीविकेचा मुख्य व्यवसाय असणाऱ्या ख्रिस्ती कोळी समाजाच्या रहिवाशांची संख्या मोठी आहे. त्यापाठोपाठ हिंदू आणि मुस्लीम समाज या ठिकाणी राहतो. या परिसराने नेहमी गिल्बर्ट मेन्डोन्सा यांना साथ दिली आहे. मेन्डोन्सा कोणत्याही पक्षात असले तरी येथील मतदार त्यांनी निवडलेल्या उमेदवारांना साथ देतात, अशी आजपर्यंतची स्थिती आहे, परंतु या निवडणुकीत हे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मेन्डोन्सा यांना इतकी वर्षे साथ देणारे हॅरल बोर्जीस, रेनॉल्ड बेचरी यांच्यासह अनेक सहकारी या निवडणुकीत त्यांची साथ सोडून गेले आहेत. इतकेच नव्हे तर या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेऊन मेन्डोन्सा यांनाच थेट आव्हान दिले आहे.

मेन्डोन्सा यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केल्याचे अनेकांना रुचलेले नाही. शिवसेनेत जाण्याआधी मेन्डोन्सा यांनी विश्वासात घ्यायला हवे होते, अशी या सहकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. याचा फायदा भाजपने घेतला आणि मेन्डोन्सा समर्थकांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारीही दिली आहे.

या प्रभागात तिरंगी लढत पाहायला मिळत असून निवडणूक त्यामुळेच अटीतटीची होण्याची शक्यता आहे. मेन्डोन्सा आपला गड राखण्यात यश मिळवतात की त्यांचे एकेकाळचे सहकारी या गडाला सुरुंग लावतात याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

  • या प्रभागातील उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी शिवसेनेने गिल्बर्ट मेन्डोन्सा यांच्यावरच दिली होती. त्यानुसार शिवसेनेकडून विद्यमान नगरसेविका हेलन जॉर्जी गोविंद, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या नगरसेविका शर्मिला बगाजी आणि एलायस बांडय़ा यांना उमेदवारी दिली आहे.
  • एलायस बांडय़ा यांच्या जागी मेन्डोन्सासमर्थक बर्नड डिमेलो यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू होता, मात्र यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले. एलायस बांडय़ा यांनी उत्तन भागात शिवसेनेचे काम केले आहे, त्यांची प्रतिमाही चांगली आहे. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली. अखेर बांडय़ा यांनाच पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली.
  • भाजपने रेनॉल्ड बेचरी यांच्या पत्नी व्ॉलेंटिना बेचरी, अंद्रात अन्सेल्मा आणि उत्तन कचराभूमीविरोधात सुरू असलेल्या संघर्षांचे नेतृत्व करणारे जेम्स कोलासो यांना उमेदवारी दिल्याने चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. कोलासो यांच्यापाठी मोठा जनाधार आहे. त्यामुळे भाजप या ठिकाणी चांगली कामगिरी करेल, असे चित्र दिसत आहे.
  • काँग्रेसची एक नगरसेविका यापूर्वी या भागातून निवडून गेली असल्याने काँग्रेसची आणि मच्छीमारांचे नेते लिओ कोलासो यांचीही या ठिकाणी ताकद आहे. मेन्डोन्सा यांच्या सोबत शिवसेनेत न गेलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका शबनम शेख, कोलासो यांचा मुलगा शॉन कोलासो आणि शोभना बगाजी असे पॅनल काँग्रेसने उभे केले आहे.
  • एमएमआरडीएने नुकत्याच जाहीर केलेल्या आराखडय़ाला उत्तनमधील रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. धारावी बेट समितीच्या माध्यमातून या विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे, परंतु आंदोलनाला राजकीय साथ मिळत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याचा निर्णय घेत समितीचे निमंत्रक प्रा. संदीप बुरकेन निवडणूक लढवत आहे.