Mira Road Murder Case: मीरा रोड या ठिकाणी झालेल्या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. मनोज साने याने गळा आवळून सरस्वती वैद्यची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. काही तुकडे फेकले, काही कुकरमध्ये शिजवले. या भयंकर हत्येचा सुगावा शेजाऱ्यांना मृतदेहाची दुर्गंधी येऊ लागल्याने लागला. त्यानंतर या प्रकरणात मनोज सानेला अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे. कोर्टाने मनोज सानेला ६ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मनोज सानेने सरस्वतीची हत्या कशी केली?
पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर आणि कथित पत्नी सरस्वती वैद्यची हत्या करण्याचा कट आखला होता. त्याने बोरीवली येथील दुकानातून किटकनाशक खरेदी केलं. हे किटकनाशक ताकात मिसळून त्याने सरस्वतीला दिलं. सरस्वतीच्या हत्येप्रकरणी जेव्हा मनोजला अटक करण्यात आली त्यावेळी सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केली असं मनोज सानेने पोलिसांना सांगतिलं होतं. तसंच आपण यात पकडले जाऊ म्हणून तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन नष्ट करत होतो असंही तो म्हणाला होता. मात्र आता मनोजनेच सरस्वतीला ताकातून विष देऊन ठार केलं आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले.
मनोज सानेने बोरीवली येथील दुकानातून किटकनाशक खरेदी केलं. दुकानदाराने मनोज सानेची ओळख पटवली आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. कारण किटकनाशक विकल्यानंतर त्याचं नाव, त्याचा बॅच नंबर या सगळ्याची नोंद रजिस्टरमध्ये करावी लागते. सानेच्या घरी जे किटकनाशक सापडलं ते किटकनाशक आणि दुकानदाराच्या दुकानातली नोंद यावरचे तपशील सारखेच आहेत, हे किटकनाशक जप्त करण्यात आलं आहे असंही पोलिसांनी सांगितलं.
निलिगीरी तेल, रुमफ्रेशनरचा वापर
मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर मनोजने तिच्या मृतदेहाला निलगिरीचं तेल लावलं होतं तसंच घरात मोठ्या प्रमाणावर रुम फ्रेशनरही मारले होते. मृतदेहाची दुर्गंधी पसरु नये म्हणून त्याने या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. पोलिसांनी निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या त्याच्या घरातून जप्त केल्या आहेत. तसंच ज्या दुकानातून मनोज सानेने ताक विकत घेतलं होतं आणि निलगिरी तेलाच्या बाटल्या घेतल्या होत्या त्या दुकानादारांचे जबाबही नोंदवले आहेत.