रेल्वे स्थानके म्हटली की जागोजागी कचरा, पान आणि तंबाखूच्या पिचकाऱ्या असे गलिच्छ चित्र सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते. मात्र हेच चित्र घेऊन आपण मीरा रोड रेल्वे स्थानकात जाणार असाल तर आपला अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. मीरा रोड रेल्वे स्थानकात जाण्यासाठी तुम्ही पादचारी पुलावर प्रवेश केलात तर तेथील सुखद रंगीबेरंगी वातावरण पाहून एखाद्या कलादालनात आलो की काय असा आभास झाल्याशिवाय राहाणार नाही. रेल्वे स्थानकांचे ओंगळ रूप बदलायचे असेल तर त्यांची केवळ स्वच्छता करून भागणार नाही तर त्यांची आकर्षक रंगरंगोटी करून, त्यांना एक कलात्मक रूप देऊन त्यांचा चेहेरामोहरा बदलला तर त्याचा स्वच्छतेच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम साधता येईल या विचारातून उपासना या स्वयंसेवी संस्थेने एका अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. रेल्वे स्थानके रंगविण्याची, त्यावर जमेल तशी कलाकुसर करण्याची.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवात केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सुरुवातीच्या काळात प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र हा उत्साह थोडय़ाच दिवसात ओसरू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. स्वच्छ केलेली सार्वजनिक ठिकाणे पुन्हा अस्वच्छ होऊ लागली आहेत. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणे केवळ स्वच्छ करून उपयोगी नाहीत तर त्यांचे सौंदर्यीकरण केले तर त्या ठिकाणी आपोआपच स्वच्छता राखली जाईल या विचारातून उपासना या स्वयंसेवी संस्थेने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतल्या रे रोड या रेल्वे स्थानकाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम दुसऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने हाती घेतले होते. त्या उपक्रमात उपासना संस्थेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. त्याच वेळी त्यांच्या डोक्यात पश्चिम रेल्वेची स्थानके सुशोभित करण्याचा विचार चमकला. योगायोगाने कार्यकर्त्यांची गाठ त्याच भागात काम करणाऱ्या अजयकुमार मिश्रा यांच्याशी पडली. मिश्रा यांनी मीरा रोड रेल्वे स्थानक स्वच्छ करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाकडून मिळवली होती. मात्र त्यांना या कामात कोणाचीच साथ मिळत नव्हती. मिश्रा यांनी हा प्रस्ताव उपासनाच्या कार्यकर्त्यां पुढे ठेवला. कार्यकर्त्यांनीही ही कल्पना उचलून धरली.
गर्दीच्या वेळी काम करणे शक्य होणार नाही म्हणून सुटीचा दिवस निवडला गेला. महावीर जयंतीचे औचित्य साधून मीरा रोड स्थानकाच्या सुशोभीकरणाचा श्रीगणेशा करण्यात आला. सुरुवातीला स्थानकातील भिंती, पुलाचे कठडे नुसत्या रंगाने रंगविण्यात आले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीनुसार त्यावर चित्रे काढली. सध्या पादचारी पुलावरचे काम बहुतांश पूर्ण करण्यात आले आहे. पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांची पावले क्षणभर का होईना, पण ही चित्र न्याहाळण्यासाठी थबकत आहेत. मीरा रोड स्थानकानंतर माहीम स्थानकातही अशा प्रकारे रंगरंगोटी करण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानकांच्या भिंतीवर अशा प्रकारे चित्र काढल्यानंतर स्थानकाचे सौंदर्य अधिक खुलते. अशा प्रकारे भिंतीवर चित्र साकारली तर त्यावर पानाच्या पिचकाऱ्या मारण्यापूर्वी लोक दहा वेळा विचार करतील अथवा कोणी तसा प्रयत्न केलाच तर इतर सहप्रवासी त्याला किमान विरोध तर नक्कीच करतील.
-सौरभ कशाळकर, उपासना संस्था.