तीन दिवसांत २५ हजारांहून अधिक खवय्यांनी मिसळची चव चाखली

विविध ठिकाणच्या मिसळची चव वसईकरांनी घेता यावी यासाठी वसईमध्ये भव्य स्वरूपात मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या मिसळ महोत्सवात वसईसह इतर भागांतील हजारो खवय्यांनी गर्दी केली होती. महोत्सवात कोल्हापुरी मिसळ हे विशेष आकर्षण ठरले होते.

वसईमध्ये प्रथमच तीन दिवसीय मिसळ महोत्सवाचे आयोजन शिवसेना नवघर- माणिकपूर शाखेतर्फे करण्यात आले होते. पार्वती सिनेमा मैदान, अंबाडी रोड येथे आयोजित केलेल्या या महोत्सवाच्या निमित्ताने खवय्यांना अस्सल मराठमोळ्या व विविध प्रकारच्या मिसळ चाखायला मिळाल्या. या महोत्सवात २५ हजारांहून अधिक खवय्यांनी तीन दिवसांत हजेरी लावली होती. वसईकरांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चवीची झणझणीत व चमचमीत मिसळ खायला गर्दी केली होती.

महोत्सवातील झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर गोड खाण्यातील मौज अनुभवण्यासाठी गोड व थंड पदार्थदेखील या मिसळ महोत्सवात ठेवण्यात आले होते. गुरूचे मोकटेल्स, औरंगाबाद साबिर भाई पान, पनवेल खरवस, पुण्यातला बर्फाचा गोळा, फ्रुट सलाड अशा पदार्थाचा आनंदही खवय्यांनी घेतला. वसईत एकाच ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिसळ खवय्यांना उपलब्ध करून देण्याचा आमचा एक प्रयत्न होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षी असा महोत्सव भरविण्याचा मानस महोत्सवाचे आयोजक शिवसेना उपशहरप्रमुख मिलिंद चव्हाण यांनी व्यक्त केला.

एकाच ठिकाणी अनेक मिसळचा स्वाद

महोत्सवात बंबातली मिसळ, माठातली मिसळ, पुणे- कोल्हापूरची झकास मिसळ, पारनेरची झटकेदार मिसळ, नाशिकची मूग- मटकी मिसळ, ठाण्याची मामलेदार मिसळ, नांदेडची मिसळ, कणकवलीची मिसळ वडे, कोल्हापूरच्या झणझणीत मिसळीबरोबर दांडगा पैलवान कट वडा आदी मिसळ एकाच ठिकाणी चाखायला वसईकरांनी मिळाल्या. काळ्या रश्शाची चमचमीत मिसळ व तांबडय़ा रश्शाची झणझणीत मिसळ, हिरव्या रश्शाची मिसळ, चुलीवरची गावरान मिसळ, पांढऱ्या रश्शाची मिसळ, जैन मिसळ अशा अनेक स्वादिष्ट व चविष्ट अशा मिसळ उपलब्ध होत्या.

Story img Loader