बदलापूर : बदलापूर शहरातून शिकवणीला जातो अस सांगून घराबाहेर पडलेला १४ वर्षांचा मुलगा अखेर गुजराच्या स्थानकावर साडपला. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी चौकशी केल असता तो मामाकडे चालल्याचे त्यांने सांगितले होते. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अभ्यासातून आलेल्या तणावामुळे तो घर सोडून निघून गेल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलिसांनी दिली आहे. हा मुलगा बेपत्ता झाल्यानंतर अनेक तर्कवितर्त लढवले जात होते. त्याचे अपहरण तर झाले नाही ना, अशीही भिती व्यक्त केली जात होती.
बदलापूर शहरात गेल्याच आठवड्यात लहान मुलांच्या खरेदी विक्री व्यवहाराचे संभाषण करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या उलटतपासणीत हा भयंकर प्रकार समोर आला होता. त्याच्या काही दिवसातच बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडी भागात राहणारा १४ वर्षीय बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. हा मुलगा शिकवणीला जातो असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र ठरलेल्या वेळी तो घरी परतलाच नव्हता. त्यामुळे कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला होता. तर बदलापुरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बदलापूर पश्चिम पोलिस त्याचा शोध घेत होते. त्यासाठी विविध पथकांच्या माध्यमातूनत तपास सुरू होता. असे असतानाच तो गुजरातमध्ये मिळून आला.
गुजरात राज्यातील बिल्लीमोरा या रेल्वे स्टेशनवर मुलगा आढळल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी मुलाने आपण घर सोडून मामाच्या घरी चालल्याची माहिती दिली. त्यानंतर बदलापूर पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ सुत्र हलवत त्याला घरी आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानुसार त्याचे पालक गुजरातला गेले असून मुलाला घेऊन परत येत आहेत, अशी माहिती बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल थोरवे यांनी दिली आहे.
मुलाने घर का सोडले
अभ्यासाच्या ताणामुळे आलेल्या नैराश्यातून मुलाने घर सोडल्याची माहिती समोर आली आहे. याच काळात तो त्याच्या मित्रांनाही घर सोडून जाणार असल्याचे बोलला होता, अशीही माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. मुलांकडून पालकांच्या अपेक्षा असणे गैर नाही. मात्र अनेकदा अवास्तव अपेक्षा बाळगल्याने मुलांच्या मनावर ताण येतो. त्यामुळे ते नैराश्येत जाऊ शकतात. परिणामी मुलांवर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे मुलांच्या क्षमता पाहून अपेक्षा ठेवाव्यात असे आवाहन पोलिसांनी केले आहे.