यंत्रणेतील त्रुटींमुळे ठाणे जिल्ह्यतील मतदार यादीत गोंधळ; छायाचित्रे दिल्यानंतरही मतदारांकडे पुन्हा मागणी

येत्या वर्षभरात येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मतदारांची अद्ययावत नोंद करण्यासाठी उपाययोजना राबवणाऱ्या निवडणूक आयोगाच्या सदोष यंत्रणेमुळे या मूळ हेतूलाच बाधा निर्माण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये मतदारांची माहिती संकलित करताना होणारा घोळ, सव्‍‌र्हरमधील अडचणी आणि मतदारांकडून आलेली सुमार दर्जाची छायाचित्रे यामुळे मतदार यादीमध्ये गोंधळ निर्माण होत आहे.

छायाचित्र देऊनही मतदारांचे नाव यादीत येण्याची शाश्वती मतदारांना नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर १ सप्टेंबर रोजी मतदान संकेतस्थळावर मतदारांची यादी जाहीर करण्यात येणार असून मतदारांनी आपली नावे यादीत असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्य़ात २०१७ या वर्षांत ४५ हजारपेक्षा जास्त मतदारांची नावे छायाचित्र नसल्याने यादीतून वगळण्यात आली आहेत. सध्या छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या नऊ लाख असून राज्यातील छायाचित्र नसलेले सर्वाधिक मतदार ठाणे जिल्ह्य़ातील आहेत, असा दावा निवडणूक कार्यालयातर्फे करण्यात आला होता. जिल्ह्य़ातील कल्याण, दिवा, मुंब्रा, ऐरोली, बेलापूर या ठिकाणच्या मतदारांची छायाचित्रे नसल्याने सर्वाधिक समस्या उद्भवत असल्याची माहिती निवडणूक कार्यालयातून देण्यात आली. त्यानुसार छायाचित्र नसलेल्या तसेच इतर माहिती अपूर्ण असलेल्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचे काम निवडणूक कार्यालयातर्फे झपाटय़ाने सुरू आहे. छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची मोहीम सुरू असतानाच नागरिकांनी मतदार यादीतील नावे, छायाचित्रांची तपासणी करण्याचे आवाहन निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आले होते. त्यानुसार काही विभागांत नागरिकांकडून छायाचित्रे जमविण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच काही नागरिकांनी प्रभाग समिती कार्यालयात जाऊन रंगीत छायाचित्रे दिली आहेत. मात्र छायाचित्र देऊनही निवडणूक कार्यालयातून कर्मचारी पुन्हा छायाचित्र मागण्यासाठी दार ठोठावत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

‘गेल्या महिन्यात बंद असलेले सव्‍‌र्हर तसेच निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या नवीन सॉफ्टवेअरमध्ये मतदारांची माहिती संक्रमित करताना येणारे अडथळे यामुळे छायाचित्रांची मागणी पुन्हा करावी लागत आहे. ईआरओ नेट व्हर्जन २ हे नवीन सॉफ्टवेअर निश्चितच चांगले आहे. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे

एकाच वेळी नाव, पत्ता, छायाचित्र ही माहिती उपलब्ध करण्यासाठी अडथळे येत आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी नागरिकांनी चांगल्या दर्जाचे छायाचित्र दिल्याशिवाय स्मार्ट कार्ड तयार करता येणार नाहीत,’ असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी सांगितले.

छायाचित्राच्या दर्जामुळे अडचणी

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आलेल्या नवीन सॉफ्टवेअरमध्ये छायाचित्र देताना चांगल्या दर्जाचेच छायाचित्र पाठवता येते. सुमार दर्जाचे छायाचित्र हे सॉफ्टवेअर स्वीकारत नाही. अनेक मतदारांनी सफेद-काळे छायाचित्र दिले आहे. हे छायाचित्र सॉफ्टवेअरवर टाकले तरी ते यादीत दिसत नाहीत. यासाठी मतदारांकडून पुन्हा छायाचित्राची मागणी करावी लागत आहे. त्यामुळे छायाचित्र गहाळ झाल्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती मुकादम यांनी दिली.

Story img Loader