ठाणे – जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणावर भर देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ‘मिशन हर घर दस्तक’ मोहिमेचा दुसरा टप्पा १ जुलैपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत सुट्टीच्या दिवशी रेल्वे स्थानकांजवळ लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात मंगळवारी लसीकरणासाठीच्या जिल्हा कृती दलाची बैठक पार पडली. या बैठकीत डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी हे आदेश दिले आहेत. तसेच यावेळी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावाही घेण्यात आला.जिल्ह्यात मागील काही आठवड्यांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे खबरदारीच्या विविध उपायोजना राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांच्या करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी १ जुलै पासून ग्रामीण भागात ‘मिशन हर घर दस्तक’ या मोहिमेचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.
या मोहिमे अंतर्गत १२ ते १४ आणि १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. तसेच शाळा सुरू झाल्यानंतर तेथे लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी शाळांमध्ये जास्तीत जास्त लसीकरण सत्र आयोजित करून १०० टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.परगे यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच लसीकरणा दरम्यान एखादी व्यक्ती संस्था अडथळा आणत असल्यास किंवा लसीकरणाविषयी गैरसमज पसरवित असल्यास त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या बैठकीला जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी, तालुका तसेच महापालिका आणि पालिका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण –
ठाणे जिल्ह्यात करोना लसीकरणासाठी सध्या शासकीय आणि खासगी अशी एकूण १०२१ लसीकरण केंद्र आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार १३ जून अखेर पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पहिला डोस ७० लाख ३० हजार ९५० (८५ टक्के) तर दुसरा डोस ६२ लाख ४६ हजार (७५ टक्के) नागरिकांनी घेतला आहे. १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यंमध्ये पहिला डोस १ लाख ४१ हजार (४४ टक्के) तर दुसरा डोस ७५ हजार २७० (५३ टक्के) असे लसीकरण झाले आहे.