अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील काही भागात एक दिवसाआड पाणी येते. काही भागात काही व्यक्ती जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना पैसे देऊन अधिकचे पाणी वळवतात. त्यामुळे इतर भागावर अन्याय होतो. पाण्याचे वितरण समन्यायी झाले पाहिजे या मागणीसाठी मंगळवारी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अनधिकृत नळ जोडण्या तोडण्यापासून विविध मुद्द्यांवर आमदार किणीकर यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

गेल्या काही वर्षात उन्हाळ्याची चाहूल लागताच अंबरनाथ, बदलापूर शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर होत जातो. अंबरनाथ शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. चिखलोली धरण, बारवी धरण आणि उल्हास नदीतून येणारे पाणी अंबरनाथ शहराला मिळते. मात्र वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अंबरनाथ शहराचा पाण्याचा प्रश्न किचकट होतो. उन्हाळा सुरू होताच विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकतात.

मंगळवारी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत आमदार किणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अंबरनाथ शहरातील विविध भागात सध्या एक दिवसाआड पाणी दिले जाते आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. अशातच काही भागात पाणी सोडणारे प्राधिकरणाचे कर्मचारी धनदांडगे आणि काही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पैसे घेत त्या भागात अधिकचे पाणी सोडत असल्याचा आरोप डॉ. बालाजी किणीकर यांनी केला. हा सर्वसामान्यांवर अन्याय आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश यावेळी आमदार किणीकर यांनी दिले.

येत्या दोन महिन्यात कडक उन्हाळा जाणवू शकतो. त्यामुळे जीवन प्राधिकरणाचे पाणी नियोजन काय आहे, त्याबाबतही किणीकर यांनी चर्चा केली. गेल्या काही वर्षात मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत नळ जोडण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील इतर प्रामाणिक नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. या नळ जोडण्या तातडीने तोडण्याचे आदेश त्यांनी दिले. जीवन प्राधिकरणाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील नागरिकांना त्रास होऊ नये याची प्राधिकरणाने काळजी घ्यावी, अशीही सूचना यावेळी डॉ. किणीकर यांनी केली.

योजनेची माहिती द्या

अंबरनाथ शहराला विधानसभा निवडणुकीपूर्वी पाणी योजना मंजूर झाली. या योजनेचे काम आता सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या उभारणीत जलकुंभ, जलवाहिन्या टाकण्यात कुठे जागेचा अडसर असल्यास ते कळवावे. जागेचा अडसर दूर केला जाईल मात्र योजना रखडायला नको, अशी भूमिका बैठकीत मांडल्याची माहिती आमदार किणीकर यांनी दिली आहे. योजनेची माहिती सातत्याने देण्याच्याही सूचना किणीकर यांनी यावेळी केल्या.