कल्याण – शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील आमदार गणपत गायकवाड यांचा समर्थक विक्की गणात्रा यांना मंगळवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने सुरूवातीला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्यांना अटक केली आहे. राज्यभर पडसाद उमटलेल्या उल्हासनगर मधील भाजप आमदार गोळीबार प्रकरणाचा तपास पोलिसांचे विशेष तपास पथक करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे: घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलांवर अखेर वाहतुक सुरक्षा घटक

उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात आमदार गायकवाड यांनी आणि त्यांचा खासगी अंगरक्षक हर्षल केणे यांनी १० गोळ्या झाडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या गोळीबार प्रकरणी महेश गायकवाड यांचे समर्थक चैनू जाधव यांनी आमदार गायकवाड, हर्षल नाना केणे, आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव, नागेश बढेकर, संदीप सरवणकर, विक्की गणात्रा आणि इतर सात साथीदारांविरूध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रारी केली. पोलिसांनी या सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांच्या निषेधाचे फलक; फलकांमधून महेश गायकवाड यांचे समर्थन

गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आमदार गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांना तात्काळ अटक केली. या प्रकरणात विक्की, वैभव, नागेश आणि सात जण फरार आहेत. गुन्हे शाखा, विशेष तपास पथक त्यांचा शोध घेत आहेत. हा शोध घेत असताना ठाणे गु्न्हे शाखेच्या पथकाने विक्की गणात्रा या आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे. आमदार गायकवाड यांच्यासह तीन समर्थक न्यायालयाच्या आदेशावरून अकरा दिवस पोलीस कोठडीत आहेत. ते कळवा येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहेत.

कोण आहे विक्की

विक्की गणात्रा हा गणपत गायकवाड यांचा खास समर्थक आहे. तो व्यावसायिक आहे. त्यांचे कल्याण पश्चिमेत शिवाजी चौक ते सहजानंद चौक दरम्यानच्या रस्त्यावर मोबाईलचे दुकान आहे. पाच वर्षापूर्वी डोंबिवलीत बेकायदा दस्त नोंदणीचे प्रकरण सुरू होते. त्यावेळी या नियमबाह्य दस्त नोंदणी प्रकरणातील व्यवहारांमध्ये विक्की गणात्रांचे नाव घेतले जात होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla ganpat gaikwad supporter vicky ganatra arrested in mahesh gaikwad firing case zws