शिवसेनेचे हरिश्चंद्र आमगावकर यांची मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी बुधवारी निवड झाली. प्रभाकर म्हात्रे यांच्या माघारीनंतर आमगावकर यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र माळी अनुपस्थित राहिल्याने आमगावकर यांना निवडणूक आणखी सोपी झाली. त्यांनी काँग्रेसच्या मर्लिन डिसा यांचा ९ विरुद्ध ६ मतांनी पराभव केला.
ठाणे जिल्हाधिकारी अश्व्ीनी जोशी यांनी या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून काम केले. शिवसेनेचे वरिष्ठ नगरसेवक प्रभाकर म्हात्रे यांनी बंडाचा झेंडा फडकावत आमगावकर यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केल्याने पक्षात चिंतेचे वातावरण होते; परंतु मंगळवारी सायंकाळी म्हात्रे यांनी उमेदवारी मागे घेतली. तरीही अपक्ष नगरसेवक प्रकाश सिंह आणि प्रभाकर म्हात्रे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेले बहुजन विकास आघाडीचे मोहन जाधव यांनी उत्सुकता ताणून ठेवली होती. परंतु प्रकाश सिंह हे महापौर गीता जैन यांच्या कारमधून उतरले आणि मोहन जाधवही युतीच्या नगसेवकांसोबत आले, त्याचवेळी आमगावकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

Story img Loader