ठाणे : मतदान यंत्र (इव्हीएम) हॅक केले असा आमचा आरोप नाही. पण, मतदान यंत्रामध्ये छेडछाड करण्यात आली आहे, असे आमचे मत आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत. १७ सी चा अर्ज आणि झालेले मतदान यांची आकडेवारी जर जुळत नसेल तर नक्कीच काही तरी घोटाळा आहे, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) विधिमंडळातील गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. हा सगळा कुणाच्या तरी आदेशावरून झालेला घोळ आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षाकडून मतदान यंत्राविषयी संशय व्यक्त केला जात असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) विधिमंडळातील गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात अनोखे आंदोलन केले. ईव्हीएम हटाओ… लोकशाही बचाओ असा नारा देत त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सामान्य नागरिकांची सुमारे दहा हजार पोस्टकार्ड पाठविली. या आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले. मतदान यंत्र हॅक केले असा आमचा आरोप नाही. मात्र, मतदान यंत्रामध्ये छेडछाड करण्यात आली, असे आमचे मत आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहोत, असे आव्हाड म्हणाले. १७ सी चा अर्ज आणि झालेले मतदान यांची आकडेवारी जर जुळत नसेल तर नक्कीच काही तरी घोटाळा आहे, असा आरोप त्यांनी केला. पाच वाजता ५२ टक्के मतदान होते. नंतर ते ६५ ते ६८ टक्के झाले. ही आकडेवारी कशी वाढली? एकदम १३ टक्के वाढ म्हणजे झालेल्या मतदानाच्या एक चतुर्थांश मतदान अवघ्या तासाभरात होऊ शकते का? ही वाढ कुठून झाली? यावर निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही, असेही ते म्हणाले. झालेले मतदान आणि मोजलेली मते यामध्ये फरक येतोय.
हेही वाचा >>>ठाण्यात शरद पवार गटाने राष्ट्रपतींना पाठविली दहा हजार पोस्टकार्ड; मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची केली मागणी
मतदान यंत्रामध्ये जर संगणकप्रणाली वापरली जात असेल तर मतदानाची टक्केवारी काढण्यासाठी असे कुठले मोठे राॅकेट सायन्स आणावे लागतेय. हा सगळा कुणाच्या तरी आदेशावरून झालेला घोळ आहे. त्यामुळेच आता जनआंदोलन सबंध भारतभर उभे राहिल. कारण, जर असेच घडत राहिले तर या देशाची लोकशाही संपुष्टात येईल. म्हणूनच आम्ही राष्ट्रपतींना हजारो नागरिकांची पत्रे पाठविली असून बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याची विनंती केली आहे, असेही ते म्हणाले. जर अमेरिकेतील मतमोजणी अडीच दिवस चालत असेल तर आपल्याकडे काय अडचण आहे. लोकशाहीत मतदान प्रक्रिया ही पारदर्शी असली पाहिजे. मी टाकलेले मत कुठे गेले आहे, हे मला कळलेच पाहिजे. त्यासाठीच आम्ही आता राष्ट्रपतींना विनंती केली आहे, असेही ते म्हणाले.