ठाणे : मुंब्रा भागातील रस्त्यावरच बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू असल्याचे थेट प्रक्षेपण बुधवारी रात्री समाज माध्यमावरून करत राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिका प्रशासनाची पोलखोल केली. या इमारतीप्रकरणी आता काय कारवाई करणार असा प्रश्नही त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात महापालिका यंत्रणा व्यस्त असल्याची संधी साधत भुमाफियांनी बेकायदा बांधकामे उभारली होती. या बांधकामांविरोधात महापालिकेने विशेष मोहिम हाती घेऊन कारवाई सुरु केली होती. त्यांनी राजकीय दबाब झुगारत बेकायदा बांधकामांवर हातोडा मारला होता. परंतु ही कारवाई थंडावताच म्हणजेच दोन वर्षांपूर्वी भुमाफिया पुन्हा सक्रिय झाले होते. त्यांनी शहरात बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सुरु केली होती. अशा बांधकामांवर गेल्यावर्षी हातोडा मारण्यात आला. आता पुन्हा कारवाई थंडावताच भुमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून या बांधकामांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासनावर टीका होऊ लागली आहे.

मुंब्रा स्थानकलगत असलेल्या खाडीमध्ये सुरू असलेल्या एका बेकायदा बांधकामाची चित्रफीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर चार दिवसांपूर्वी प्रसारित केली होती. याबाबत स्वतः मुंब्रा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे फोटो आणि पत्र पाठवून तसेच भ्रमणध्वनीवरून फोन करून तक्रार केली आहे. मात्र, अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून हप्ते घेतले जात असल्याने ते कारवाई करण्याची हिमंतच दाखवत नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यापाठोपाठ बुधवारी त्यांनी मुंब्र्यातील मुख्य रस्त्यावर बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे उघड करत या बांधकामाच्या ठिकाणाहून त्यांनी समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपण करून पालिकेची पोलखोल केली.

आव्हाडांचा आयुक्तांना प्रश्न

ममुंब्र्यातील पिंट्या दादा हाऊस समोरील मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या बेकायदा इमारतीचे बांधकाम पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही. पालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त बाळू पिचड यांच्या पालिका मुख्यालयात बसलेल्या सर्व अधिकाऱ्यांना वारंवार सांगतोय की, बेकायदा इमारतींची कामे बंद करा. सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. तरीही इमारतीची कामे कोणीही बंद करायला तयार नाही. त्यामुळेच मुख्य रस्त्यावरील इमारत शोधून काढली आहे. अशा इमारतींमुळे मुंब्र्याचे वाटोळे होत आहे. पाणी आणि पार्किंगची समस्या निर्माण होत आहे, असे आव्हाड म्हणाले. या इमारतीच्या बांधकाम सुरू असल्याचे पुरावे दाखवत आता काय कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी आयुक्त राव यांना विचारला आहे.