आमदार ज्योती कलानी यांची स्पष्टोक्ती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ओमी कलानी यांच्या भाजप प्रवेशाविषयी येथील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात असले तरी टीम ओमी कलानी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भाग असल्याची स्पष्टोक्ती आमदार ज्योती कलानी यांनी बुधवारी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना केली. तुम्ही ज्याचा उल्लेख टीम ओमी करता ती मंडळी राष्ट्रवादीचीच आहेत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व राष्ट्रवादीपासून वेगळे करता येणार नाही, असेही कलानी यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही महिन्यांपासून ज्योती कलानी यांचे ओमी यांच्या राजकीय वाटचालीविषयी वेगवेगळ्या चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात सुरु असून त्यांचा भाजपकडे कल असल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. उल्हासनगर शहरात सिंधी बहुल मतदारांमध्ये अजूनही कलानी यांचा करिष्मा कायम  आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट ऐन भरात असतानाही येथून राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांनी मोठा विजय मिळवला होता.

ज्योती यांच्या विजयात उल्हासनगर महापालिका हद्दीतील जवळपास ४० प्रभागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असणारी सिंधी मते निर्णायक ठरली होती. त्यामुळे यंदा शिवसेनेसोबत दोन हात करताना कलानी पुत्र ओमी यांना पक्षात प्रवेश देण्याचा विचार भाजपच्या गोटात सुरू आहे.

ओमी आमचेच

गेल्या काही महिन्यांपासून मिशन ४० आणि सत्ता 2017 अशा टॅगलाईन वापरून आमदार ज्योती कलानी यांचा पुत्र ओमी कलानीने आपल्या तरूण सहकाऱ्यांना एकत्र करत टीम ओमीच्या नावे प्रचाराचा धुरळा उडवला आहे. या प्रचाराच्या माध्यमातून या मंडळींनी उल्हासनगरच्या विकासाचा  जाहिरनामाही प्रसिद्ध केला आहे. त्याचप्रमाणे विवीध कार्यकर्त्यांना उमेदवारी जाहीर करत निवडणुकीचे रणिशग फुंकण्यात आले आहे. एकीकडे ओमी यांच्याकडून प्रचाराचा धडाका सुरु असताना त्यामध्ये राष्ट्रवादीचे चिन्हे मात्र टाळले जात असल्याचे चित्र आहे. ओमी यांच्या प्रचार कार्यालयांमध्ये पप्पू कलानी, ज्योती कलानी यांचे छायाचित्र लक्ष वेधून घेत असले तरी राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह मात्र दिसत नसल्याने एकंदर संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान यासंबंधी आमदार ज्योती कलानी यांना छेडले असता त्यांनी टिम ओमी आणि राष्ट्रवादीत अंतर नाही, असा दावा केला. येत्या शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक उल्हासनगरात  हजेरी लावणार असून त्यावेळी ते निवडणूकीतील पक्षाची रणनिती जाहीर करतील.