बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना, औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा करण्यासाठी बारवी धरणाची उभारणी आणि विस्तार करण्यात आला. मात्र या धरणासाठी जमिनी देणाऱ्या स्थानिकांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. यातील काहींना नोकरीची प्रतिक्षा आहे, काहींना मोबदला आणि त्यावरील वाज मिळालेले नाही. तिसऱ्या टप्प्यानंतर ६१ हेक्टर अतिरिक्त क्षेत्र पाण्याखाली गेले. मात्र त्याचे भूसंपादन करण्यात आलेले नाही. त्यामुळे हे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी आमदार किसन कथोरे यांनी विधानसभेत केली.
झपाट्याने वाढणाऱ्या ठाणे जिल्ह्याची पाण्याची तहाण भागवण्याचे महत्वाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणामुळे शक्य झाले. बारवी धरणाची स्थापना १९७२ च्या सुमारास झाली असली तरी बारवीचे तिसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरण पाच वर्षांपूर्वी पूर्णत्वास आले. धरणाची उंची वाढवली असली तरी भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने धरणात पाणी साठवले जात नव्हते. अखेर निळवंडे धरणाच्या धर्तीवर मोबदला, त्यात सरकारी नोकरी देण्याचे निश्चित झाल्यानंतर बारवी धरणात अतिरिक्त पाणी साठवले गेले. बारवी धरणामुळे ठाणे जिल्ह्याची तहाण भागली गेली. मात्र धरणग्रस्तांच्या मोबदल्याचा प्रश्न निकाली निघाला नाही. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेनशात बारवी धरणाचा मुद्दा उपस्थित केला. धरणाच्या विस्तारासाठी जागा भूसंपादित केल्या. मात्र त्यांना देय असलेले व्याज दिले गेले नाही. त्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्य बैठकीत झाला. मात्र व्याजाची रक्कम मिळाली नाही, अशी माहिती कथोरे यांनी सभागृहात दिली. तसेच तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लाभ तसेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थांना व्याज कधी लाभ मिळणार असा प्रश्न कथोरे यांनी उपस्थित केला.
बारवी धरणाच्या विस्तारीकरणात तिसऱ्या टप्प्यात अतिरिक्त ६१ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले. मात्र त्याचा मोबदला मिळाला नाही. धक्कादायक म्हणजेे पाच वर्षांनंतरही याची भूसंपादन प्रक्रिया सुरूच झाली नाही. त्यामुळे ती प्रक्रिया कधी पूर्ण करणात असाही प्रश्न कथोरे यांनी उपस्थित केला. त्यावर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लाभार्थ्यांच्या मोबदल्याचे वाज १५ दिवसात वितरीत करण्याचे आश्वासन दिले.
भूसंपादन प्रक्रिया सुरू करणार
बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याखाली गेलेल्या ६१ हेक्टर अतिरिक्त क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया एमआयडीसी प्रशासन सरू करणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच लाभार्थ्यांना देय असलेली व्याजाची रकक्म ३ कोटी ५१ लाख असल्याचेही सामंत यांनी सांगितले आहे.
बारवीचे लाभार्थी
बारवी धरण विस्तारीकरण प्रकल्पात एकूण १ हजार २०४ बाधित होते. त्यातील १ हजार १३६ लाभार्थ्यांनी नोकरी आणि मोबदल्यासाठी अर्ज केले होते. त्यातील ६३ जणांनी १० लाखांचा मोबदला स्विकारला, तर ५७८ लाभार्थी नोकरीसाठी पात्र ठरले. विभक्त कुटुंबामुळे काही जण अपात्र ठरले. तसेच टप्पा एक आणि टप्पा दोनमधील २०३ लाभार्थी आहेत. त्यांनाही इतर पालिकांमध्ये समाविष्ट करण्यासाठी पालिकांना सांगितले जाणार आहे.