लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर : आम्हाला जर लोक फोडायचे असते तर आम्हीही बरेच घेऊ. ते उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे घेऊन नेऊ, अशा शब्दात आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर कथोरे यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जाते. विधानसभा निवडणुकीपासून आमदार किसन कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात संघर्ष सुरू आहे. एकमेकांवर सातत्याने ते टीकास्त्र सोडतात.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांनी वामन म्हात्रे आयोजीत आगरी महोत्सवाच्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी हा प्रवेश घडवून आणला. त्यातच दोन दिवसांपूर्वी म्हात्रे यांनी चतुरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेटही घालून दिली. चतुरे हे भाजपचे बदलापूर गावातील नगरसेवक होते. याच प्रभागात भाजपचे आमदार किसन कथोरे यांचेही निवासस्थान आहे. त्यामुळे चतुरे यांचा प्रवेश घडवून म्हात्रे यांनी कथोरे यांना शह दिल्याची चर्चा रंगली आहे. विधानसभा निवडणुकीत वामन म्हात्रे यांनी कथोरे यांना विरोध केल्याने त्यावेळी कथोरे यांनी शिवसेनेच्या उपशहरप्रमुखाला ऐन प्रचारात गळाला लावले होते. त्यामुळे महायुतीत फोडाफोडीचे राजकारण केले जात असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता म्हात्रे यांनी चतुरेंच्या शिवसेना प्रवेशातून परतफेड केल्याचे बोलले जाते.

आणखी वाचा-विधानसभेतले बंडखोर पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर?

याच पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांनी या प्रवेशावर आपले मत मांडले आहे. हेमंत चतुरे यांना भाजपातून निलंबीत करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी पक्षविरोधी काम केल्याने त्यांना निलंबीत केले होते. त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना कुठेही पर्याय नसल्याने ते तिकडे गेले असावेत अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली. त्याचवेळी बोलताना त्यांनी पक्षप्रवेश करणाऱ्यांना इशाराही दिला आहे. आम्हाला जर लोक फोडायचे असतील तर आम्हीही बरेच घेऊ. ते उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात. आम्ही मुख्यमंत्र्यांकडून घेऊन जाऊ असेही कथोरे यावेळी बोलताना म्हणाले. त्यामुळे कथोरे आणि म्हात्रे वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होते आहे.