बदलापूरः मी लुटारूंकडे लक्ष देत नाही. मी हातभार लावणाऱ्यांकडे लक्ष देतो. ज्यांनी लुटायचे धंदे केले त्यांना जर मी महत्व दिले तर स्मारकाच्या ठिकाणीही टपऱ्या उभ्या राहतील. अतिक्रमणेही होतील, अशी बोचरी टीका आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यावर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात वामन म्हात्रे यांनी आमदार कथोरे यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या सोनिवली येथील स्मारकाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावेळी बोलताना, जमत नसेल तर स्मारक आमच्या हातात द्या, अशी टीका केली होती. त्याला कथोरे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर शहर सध्या शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या वादामुळे चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीपासून येथील राजकीय वातावरण बिघडले आहे. स्थानिक भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपासून या दोन्ही नेत्यांमध्ये खटके उडताना दिसत आहेत. त्याचा नवा अध्याय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त समोर आला.
शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजीत बोलताना आमदार किसन कथोरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नातून सोनिवली भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकावरून वामन म्हात्रे यांनी कथोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. कल्याण येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि ज्ञान केंद्र उभारले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट डिजीटल माध्यमातून साकारण्यात आला आहे. होलोग्राफीसारखे नवे तंत्रज्ञान वापरून येथे डॉ. आंबेडकरांचे राजकीय विचार, तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या स्मारकाला शक्य असल्यास
भेट द्या आणि समजून घ्या, असा टोला वामन म्हात्रे यांनी आमदार कथोरेंना लगावला होता. आपण मुंबईजवळ राहतो, त्यादृष्टीने बांधकामाचा दर्जा असावा. तुम्हाला सोनिवली येथील स्मारक योग्यरितीने करता येत नसेल, जमत नसेल तर आमच्या हातात स्मारक द्या, असे आवाहन म्हात्रे यांनी केले होते.
त्यावर बोलताना आमदार किसन कथोरे यांनी वामन म्हात्रे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी लुटारूंकडे लक्ष देत नाही. मी हातभार लावणाऱ्यांकडे लक्ष देतो, अशी बोचरी टीका यावेळी कथोरे यांनी केली. ज्यांनी लुटायचे धंदे केले त्यांना महत्व दिले आणि त्यांच्या हातात स्मारक दिले तर इथे टपऱ्या उभ्या राहतील आणि अतिक्रमणे होतील असेही कथोरे म्हणाले. म्हात्रे यांचे वर्चस्व असलेल्या बदलापूर येथील वडवली परिसरातील तलावावरूनही कथोरे यांनी म्हात्रे यांच्यावर टीका केली. त्यांच्या येथील तलावाची परिस्थिती काय आहे. सुशोभीकरण केलेला हा तलाव आहे. त्याची आता कामाची निविदा निघाली. तिथे कंत्राटदाराला काम करू दिले जात नाही. सर्व आम्हालाच काम पाहिजे अशी त्यांची भूमिका असल्याची टीकाही कथोरे यांनी केली. स्मारक हे लुटण्यासाठी नाही. इथे खऱ्या अर्थाने भावना ठेवल्या पाहिजेत.इथे बाबासाहेबांचा पदस्पर्थ झालेला आहे. हे कुणाच्याही हाती देण्यासाठी नाही. जनतेने मला यासाठीच इथे ठेवले आहे, असेही कथोरे यावेळी म्हणाले. तुम्ही काय करता, बाळासाहेबांचा पुतळा की काय करणार आहेत त्याचा खर्च जनतेला दाखवा, मगच बोला, असेही कथोरे यावेळी म्हणाले. वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने पश्चिमेतील शांतीनगर येथे बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाते आहे. त्यावरून कथोरे यांनी म्हात्रे यांना प्रश्न विचारला.