लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : येत्या पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत आमदार किसन कथोरे यांनी दिले आहे. आपण विधानसभा निवडणुकीत एकटे लढलो. सगळे विरोधात असतानाही भाजपने आपली ताकद दाखवली आहे. त्यामुळे येत्या काळात वरिष्ठांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल. मात्र भाजप एकहाती सत्ता स्थापन करेल, असे आमदार किसन कथोरे म्हणाले आहे. विधानसभेपासून बदलापुरात शिवसेनेचे वामन म्हात्रे विरूद्ध किसन कथोरे यांचा संघर्ष वाढला आहे. या संघर्षाचा फटका येत्या काळात पालिका निवडणुकांमध्ये महायुतीला बसण्याची भीती व्यक्त होते आहे.

विधानसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार किसन कथोरे विरूद्ध शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी असे चित्र निर्माण झाले होते. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी सुरूवातीला थेट विरोध करत नंतर प्रचारातून काढता पाय घेतला होता. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आमि माजी नगरसेवकांची कोंडी झाली होती. शहरप्रमुखाच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा की महायुतीचा धर्म पाळायचा अशा संभ्रमात ते होते. त्यातच भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनीही प्रचारातून अंग काढल्याने किसन कथोरे एकटे लढत असल्याचे चित्र होते. त्यांच्या मदतीला ऐनवेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले.

शिंदे यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नगरसेवकांना थेट फोन करून आमदार कथोरे यांचे काम करण्याचे आदेश दिले होते. तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या उमेदवारांच्या सभा घेण्याऐवजी आमदार कथोरे यांच्यासाठी बदलापुरात सभा घेतली होती. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कथोरे यांच्यासाठी काम केले. मात्र या सर्व प्रकारात कथोरे दुखावले होते. त्यांनी विजयाला काही तास उलटत नाही तोच आपल्या पहिल्याच भाषणाच सर्व विरोधकांना निर्वानीचा इशारा दिला होता. माजी लोकांना पुन्हा आजी होऊ देणार नाही, असेही कथोरे त्यावेळी म्हणाले होते. त्यानंतर बदलापूर शहरात कथोरे विरूद्ध वामन म्हात्रे यांच्यात शाब्दीक चकमकी होतच होत्या. आता कथोरे यांनी पुन्हा पालिका निवडणुकांमध्ये भाजप एकहाती सत्ता स्थापन करू शकते असा दावा केला आहे.

रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी याचा पुनरूच्चार केला. ‘वरिष्ठांचा जो आदेश असेल तो आम्हाला मान्य असेल. नाहीतरी विधानसभा मी एकट्यानेच लढली. सगळे विरोधात होते. विधानसभेला दाखवून दिलेल आहे की भाजपा निश्चितपणे मजबूत आहे. जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करू. जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय भाजपा एकहाती सत्ता स्थापन करेल’, असे कथोरे म्हणाले आहेत. कथोरे यांच्या वक्तव्याने भाजपातील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र ज्यांनी आमदार किसन कथोरे यांच्यासाठी शहरप्रमुखांच्या मर्जीविरूद्ध जाऊन काम केले त्यांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

Story img Loader