दिवा-आगासन रस्त्याच्या निकृष्ट काम आणि खड्ड्यामुळे अपघात होऊन गणेश पाले या तरुणाचा मृत्यु झाल्याचा आरोप करत याप्रकरणी रस्त्याचा ठेकेदार व पालिका अभियंत्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. गुरूवारी डावखरे यांच्यासह दिव्यातील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन ही मागणी केली. तसेच त्याच्या कुटूंबियांना दहा लाखांची भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दिवा प्रभाग समितीच्या हद्दीतील दिवा-आगासन रस्त्यावरील साईबाबानगर येथे मोठ्या प्रमाणावर ख़ड्डे पडले आहेत. या मार्गावरून गणेश पाले हा तरुण दुचाकीवरून जात होता. त्यावेळी खड्डयामुळे तोल जाऊन खाली पडून तो टँकरच्या चाकाखाली आला. त्यात त्याचा मृत्यु झाला. तो माळीकाम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या मृत्युमुळे त्याच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या रस्त्याचे मागील पाच वर्षापासून काम सुरू आहे. अतिशय संथगतीने या रस्त्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने काम झाल्याच्या तक्रारी देखील वारंवार अनेक नागरिकांनी केल्या आहेत. त्याचबरोबर गणेश नगर, बेडेकर नगर, आगासन पट्ट्यामध्ये या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप भाजपचे आमदार डावखरे यांनी केला आहे.
निकृष्ट दर्जाचे काम व अर्धवट कामाचा फटका गणेश या तरुणाला बसला असून निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. खड्ड्यामुळे त्याचा हकनाक जीव गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी डावखरे यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच या चौकशीत रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर निराधार झालेल्या पाले कुटुंबियांना महापालिकेने १० लाख रुपयांचे अर्थसाहा देण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यावेळी दिवा शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.