कल्याण : मुंब्रा बाह्यवळण रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी बंद असल्याने या रस्त्याने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांचा भार कल्याण-शिळफाटा रस्त्यावर आला आहे. दिवसा या रस्त्यावरून अवजड वाहनांना प्रवेशबंदी असताना नवी मुंबई हद्दीतील वाहतूक पोलीस अवजड वाहन चालकांकडून चिरीमिरी घेऊन वाहने तळोजा भागातून कल्याण शिळफाटा रस्त्यावर सोडतात. हा गैरप्रकार तातडीने थांबविण्यात यावा, अशी मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टपासून शिळफाटा रस्त्यावरील रस्ता रुंदीकरण, काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण झाल्याने या रस्त्याची वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका झाली होती. प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मुंब्रा बाह्यवळण रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यापासून शिळफाटा रस्त्यावर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. पुणे, पनवेलकडून येणारी वाहने कळंबोली, तळोजा परिसरात अवजड वाहनांच्या कोंडीत एक ते दोन तास अडकून पडतात. ही वाहने पुढे तळोजा, पनवेल रस्त्याने शिळफाटा दिशेने येऊन कल्याण-शिळफाटा रस्त्याने पत्रीपूल, दुर्गाडीवरून इच्छित स्थळी जातात.
दिवसा या रस्त्यांवरून अवजड वाहने सोडू नका, असे वाहतूक पोलिसांना आदेश असताना नवी मुंबई हद्दीतील वाहतूक पोलीस अवजड वाहन चालकांकडून चिरीमिरी घेऊन दिवसा अवजड वाहने कल्याण शिळफाटा दिशेने सोडतात. ही अवजड वाहने नियंत्रित करणे मुंब्रा, कल्याण वाहतूक पोलिसांच्या आवाक्यात राहत नाही. त्यामुळे शिळफाटा रस्त्यावर दररोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहन कोंडी होत आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका कोकणात सुट्टीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना, नोकरीसाठी नवी मुंबई, मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना होत आहे. याचे भान ठेऊन दिवसाची शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यासाठी नवी मुंबई, ठाणे वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे.
शिळफाटा रस्त्यावरील गावांमधून येणारे अनेक ठिकाणचे पोहच रस्ते वाहतूक विभागाने बंद केले आहेत. गाव हद्दीतून येणारी दुचाकी, चारचाकी वाहने वाहन चालक उलट मार्गिकेतून चालवित आहेत. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडत आहे. आणि अपघातांचे प्रमाणही वाढले आहे, असे स्थानिकांनी सांगितले.