ठाणे : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी राजन साळवी यांचे पुतणे दुर्गेश साळवी यांची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात (एसीबी) सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. यावेळी कार्यालयाबाहेर राजन साळवी देखील उपस्थित होते. माझ्यावर काही जणांचा राग असेल तर माझ्यावर कारवाई करा, परंतु माझ्या कुटुंबियांना त्रास देणे हे चुकीचे आहे. नियती त्यांना धडा शिकवेल. आम्ही सदैव उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत असे राजन साळवी म्हणाले.
आमदार साळवी यांनी ऑक्टोबर २००९ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत रत्नागिरीमध्ये वेगवेगळया ठिकाणी तीन कोटी ५३ लाख ८९ हजार ७५२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केली होती. त्याबाबतचे समाधानकारक स्पष्टीकरण त्यांनी सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. मंगळवारी त्यांचे पुतणे दुर्गेश साळवी यांना मालमत्ता संदर्भातील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते असे एसीबीच्या वतीने सांगण्यात आले. सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली.
हेही वाचा : कल्याणमधील मलंग रोड भागातील व्दारली, दावडी येथील बेकायदा चाळी जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
या चौकशीनंतर राजन साळवी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. गेल्या दीड वर्षांपासून एसीबीच्या माध्यमातून माझी आणि कुटुंबाची चौकशी सुरू आहे. माझ्या पुतण्याला ठाण्यातील मुख्य कार्यालयात बोलविण्यात आले. आम्ही चौकशीत सहकार्य करत आहोत. माझ्यावर राग असेल तर माझ्यावर कारवाई करा. परंतु माझ्या कुटुंबियांना याप्रकरणात सामाविष्ट करून त्यांना त्रास दिला जात आहे. हे चुकीचे आहे, नियती त्यांना धडा शिकवेल. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत असे राजन साळवी म्हणाले.