ठाणे स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून दिल्या जाणाऱया विधान परिषदेच्या जागेसाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ९९.७२ टक्के इतके मतदान झाले असून, आता निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ठाण्यातील या जागेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक, तर राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे यांच्या चुरशीची लढत आहे. एकूण मतदारांची संघ्या १०६० इतकी होती. त्यातील १०५७ मतदारांनी मतदान केले आहे. यात ५१९ पुरूष, तर ५३८ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

भाजप-शिवसेनेतील भांडणाचा ठाण्याच्या निवडणुकीवर परिणाम?

दरम्यान, शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना भाजपने पाठिंबा दिला आहे. तर वसंत डावखरे यांना काँग्रेससह हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही पाठिंबा दिला आहे. तरीही फाटक यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे अपक्ष आणि इतर छोटे पक्ष काय भूमिका घेतात याकडे साऱयांचे लक्ष असणार आहे.