लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या निर्मितीसाठी दररोज तीनशे ट्रक इतकी माती खणली जाणार असून हि माती खारेगाव ते गायमुख खाडीकिनारी मार्ग, भिवंडी येथील आतकोली कचरा भुमी आणि वनविभागाची जागेत भरावासाठी वापरण्याच्या तीन पर्यांवर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून विचार सुरू आहे. या तिन्ही प्रकल्पांच्या ठिकाणी माती टाकायची झाली तर, खर्च किती येऊ शकतो आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते का, याचाही अभ्यास केला जात आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रकल्पाचे काम करण्यात येत असून या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर १२ मिनिटात पार करणे शक्य होणार आहे. घोडबंदर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून हा मार्ग तयार करण्यात येत आहे. या प्रकल्प कामातील अडथळे दूर करण्याबरोबरच विविध परवानग्यांच्या पार्श्वभूमीवर पालिकेत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीला पालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीए आणि बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधी उपस्थित होते.

आणखी वाचा-वासिंद पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्याचे निलंबन, तरुणाच्या मृत्यूनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

या बैठकीत ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामादरम्यान दररोज तीनशे ट्रक माती निघणार असून ती टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीची मागणी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने बैठकीत केली होती. यानंतर इतक्या मातीची विल्हेवाट कशी लावयची यावरही बैठकीत चर्चा झाली असून त्यावेळेस विविध प्रकल्पांच्या भरावासाठी ही माती वापरण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार, हि माती खारेगाव ते गायमुख खाडीकिनारी मार्ग, भिवंडी येथील आतकोली कचरा भुमी आणि वनविभागाची जागेत भरावासाठी वापरण्याच्या तीन पर्यायांवर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून विचार सुरू आहे.

आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्गावरील अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

घोडबंदर मार्गावर दिवसा वाहतूक कोंडी असते. या काळात माती वाहतूक केल्यास तीनशे ट्रकचा भार रस्त्यावर येऊन कोंडी होऊ शकते. यामुळे रात्रीच्या वेळेत वाहतूक करावी लागणार आहे. परंतु रात्रीच्या वेळेत अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. यामुळे या वेळेतही वाहतूक केल्यास कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माती वाहतूक कोणत्या वेळेत करायची यावर विचार सुरू आहे. तसेच भिवंडी येथील आतकोली भागात राज्य शासनाने ठाणे महापालिकेला कचराभुमीसाठी जागा दिली आहे. परंतु भुयारी मार्ग ते आतकोली प्रकल्प हे अंतर जास्त असल्याने वाहतूक खर्च जास्त होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या येथे माती करणे शक्य आहे का याचाही विचार करण्यात येत आहे. तसेच वनविभागाने जागा दिल्यास तिथे इतकी माती टाकणे शक्य आहे का, यावरही विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.