मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही ठेकेदार मिळेना; प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा
ऋषिकेश मुळे, ठाणे</strong>
मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतुकीचा वेग वाढवण्यासाठी आणि भिवंडी नाक्यावरील अवजड वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माणकोली आणि रांजणोली येथे आखलेल्या उड्डाणपुलांची रखडपट्टी कायम आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर, दोन महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आल्या. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने फेरनिविदा काढण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील वाढत्या वर्दळीचा मोठा परिणाम भिवंडी-कल्याण फाटा आणि अंजूर दिवे या भागांतील रस्त्यांवर दिसून येतो. येथील वाहतूक कोंडी भीषण होऊ लागल्यामुळे सात वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यास सुरुवात केली. मात्र गेल्या काही वर्षांपासून या पुलाचे बांधकाम रखडले आहे. माणकोली जंक्शन आणि रांजणोली जंक्शन येथील चारपदरी उड्डाणपूल केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाच्या सूचनेनुसार सहापदरी करण्याचे नियोजन आहे. या बदलामुळे अतिरिक्त भूसंपादन करावे लागले. महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी माणकोली येथील उड्डाणपूल मे २०१७, तर रांजणोली उड्डाणपूल डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नियोजन होते. नंतर हे दोन्ही उड्डाणपूल ऑगस्ट २०१८ पर्यंत पूर्णत्वास जातील, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सांगण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न होता काम ठप्प झाले.
जानेवारीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीतील सभेत या पुलांचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा केली. त्यानंतर काही दिवसांतच निविदा काढण्यात आली होती, मात्र या निविदेला योग्य प्रतिसाद न मिळल्याने फेरनिविदा काढण्यात आल्याचे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.
दिलेल्या मुदतीमध्ये माणकोली आणि रांजणोली पुलांची कामे पूर्ण होतील. निविदेला योग्य प्रतिसाद आल्यानंतर अर्धवट पुलांचे बांधकाम वेगात पूर्ण करण्यात येईल.
– दिलीप कवठकर,जनसंपर्क अधिकारी, एमएमआरडीए